हाँगकाँगमधील एक फ्लॅट काही शे कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा व्यवहार आशियामधील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. हाँगकाँगमधील व्यवसायिक असणाऱ्या व्हिक्टर ली यांच्या सी. के. असेट होल्डिंग्स लिमेटेडने २१ बोरेट रोड या आलिशान इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये हा फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट नक्की कोणी खरेदी केला आहे यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आलेली नाही.

हाँककाँग हे शहर येथील महागड्या, अलिशान प्लॅट्ससाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी असणाऱ्या २१ बोरेट रोड या आलिशान प्रकल्पातील एक फ्लॅट तब्बल ४३० कोटींना विकला गेलाय.  करोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे हाँगकाँगमध्येही मंदीचे वातवरण असतानाच हा आशियामधील सर्वात मोठा व्यवहार ठरलेला ४३० कोटींचा सौदा झाल्याने यासंदर्भात देशात चर्चा केल्या जात आहेत. व्हिक्टर ली यांनी एक फ्लॅट ४३० कोटींना विकून सर्वात मोठा व्यवहार केल्याचा विक्रम विक्रेता म्हणून आपल्या नावे केलाय. पाच बेडरुम असणाऱ्या या फ्लॅटमध्ये स्विमिंग पूल, खासगी गच्ची आणि ती पार्कींगसारख्या सेवा देण्यात आल्याचे, ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

२१ बोरेट रोडवरील पाच बेडरुम असणारा हा फ्लॅट तीन हजार ३७८ स्वेअर फुटांचा आहे. प्रती स्वेअर फूट एक लाख ३६ हजार हाँगकाँग डॉलर एवढा खर्च हा फ्लॅट बांधण्यासाठी आलाय. या फ्लॅटमध्ये अनेक अलिशान सेवा देण्यात आल्या आहेत. मात्र एवढी मोठी रक्कम देऊन हा फ्लॅट कोणी विकत घेतला आहे याबद्दलची माहिती कंपनीने दिलेली नाही. मात्र जगातील सर्वाधिक महागडी घर असणारी बाजारपेठ म्हणून हाँगकाँगकडे पाहिलं जातं. येथील घर खरेदी विक्री व्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्याने येथील प्लॅट्सला असणारी मागणी वाढली आहे. एवढ्या मोठ्या किंमतीला हा फ्लॅट विकला गेल्याने मंदीचं मळभ दूर होऊन याच परिसरातील इतर घरांनाही आता चांगल्या किंमती मिळतील अशी अपेक्षा बांधकाम व्यवसायिकांना आहे. येथील आलिशान घरांच्या किंमती २०२० मध्ये आठ टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. मात्र आता करोनानंतर पुन्हा हळूहळू बांधकाम व्यवसायिकांना दिलासा देणारे व्यवहार होत असल्याने अशा मोठ्या व्यवहारांमुळे पुन्हा एकादा ग्राहकांचा बाजारपेठेवर विश्वास निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.