जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत चोख उत्तर दिलं आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या कारवाईचं स्वागत करत आपण सरकारसोबत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सरकारने आता मसूद अजहर आणि हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

ओवेसी यांनी म्हटलं आहे की, ‘पुलवामा हल्ल्यानंतर दोन ते तीन दिवसांत अशाप्रकारे उत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा होती. या कारवाईचं स्वागत आहे. आम्ही सरकारसोबत आहोत. परराष्ट्र सचिवांनी ही लष्करी कारवाई नसल्याचं म्हटलं आहे. हे पाऊल सरकार फार आधी उचलेल अशी अपेक्षा होती. आता सरकार मसूद अजहर आणि हाफिज सईदचा पाठलाग करेल अशी आशा’.

याआधी ओवेसी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला संपूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे असं म्हटलं होतं. पाकिस्ताननेच कट रचून हा हल्ला घडवून आणला. पाकिस्तानवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही सरकारसोबत आहोत असं असदुद्दीन ओवेसी शनिवारी शिवाजी पार्कवरील सभेत म्हणाले होते. हा हल्ला घडवणारी जैश-ए-मोहम्मद माझ्या दृष्टीने जैश-ए-शैतान आहे. मसूद अजहर मौलाना नाही तर सैतान आहे अशा शब्दात ओवेसींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता.

जैशने पुलवामामध्ये केलेला हल्ला पहिला हल्ला नाही. याआधी सुद्धा त्यांनी पठाणकोटमध्ये हल्ला केला आहे. जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा आम्ही सर्व एक आहोत हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे असे ते म्हणाले होते. भारतात विविधतेत एकता आहे. हिंदुस्थानात मशिदीत नमाज अदा होणार, मंदिरात घंटा वाजणार हे लक्षात ठेवा. पाकिस्तानातील राजकारण्यांनी हिंदुस्थानातल्या मुस्लिमांची चिंता करु नये. आम्ही मोहम्मद अली जिना यांना त्याचवेळी धुडकावलं आणि हिदुंस्थानला निवडल आहे हे लक्षात ठेवा.

पाकिस्तानच्या धमक्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. त्यांचे इशारे आम्ही पायाच्या चप्पलेखाली ठेवतो अशा शब्दात पाकिस्तानला सुनावले होते. पाकिस्तानवर टीका करतानाच २०० किलो आरडीएक्स भारतात कसे आले ? याचा सुद्धा फोटोसेशनमधून वेळ मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचार करावा. हे आपल्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का ? असा सवाल त्यांनी केला होता.