चलनी नोटांसाठी देशी बनावटीचा कागद तयार करण्यासाठीच्या कागद उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. त्यामुळे देशाचे येत्या काही वर्षांत पंधराशे कोटी रुपये वाचणार आहेत. मेक इन इंडियातील हा पहिला प्रकल्प होशंगाबाद येथे सुरू झाल्याचे जेटली यांनी जाहीर केले.
 मेक इन इंडिया योजनेंतर्गत आता देशपातळीवर चलनी नोटांच्या कागदाचे उत्पादन सुरू होत आहे. जास्त किमतीच्या नोटा त्यावर छापल्या जाणार आहेत. आतापर्यंत आयात केलेल्या कागदावर भारतीय शाई वापरून नोटा छापल्या जात होत्या. आता त्या भारतीय कागदावरच छापल्या जातील असे जेटली यांनी सांगितले. सिक्युरिटी पेपर मिलची कागद उत्पादनक्षमता वर्षांला ६ हजार टन इतकी आहे. मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात एरवी बिमारू राज्य म्हणून गणल्या गेलेल्या मध्य प्रदेशात होत आहे ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
बरेली : मध्य प्रदेशातील कोटय़वधी रुपयांच्या व्यापम घोटाळ्याप्रकरणी ग्वाल्हेरच्या विशेष कृती दलाने डॉ. रूपेंद्र आर्य ऊर्फ अंकुर यांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अंकुर यांनी आपले बीएएमएसचे शिक्षण बीएचयूमधून पूर्ण केले असून त्यांचा २ जून रोजी विवाह होणार आहे. आपल्या पुत्राला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.