जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवड येथे 24 ऑगस्ट 1898 मध्ये झाला. ज्या काळात शिक्षणाच्या सोयी वा सवलती उपलब्ध नव्हत्या त्या काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले यातच त्यांचा मोठेपणा आहे. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अभ्यास केला. 1918 ते 21 साली त्यांनी सन्मार्ग दर्शक मंडळाची स्थापना करून सामाजिक सभा, संमेलने मौलिक व्याख्याने नाटके प्रौढांकरता रात्रीचे वर्ग चालवले. सोबतच व्यायामशाळा काढून तरूण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. तिचे ते कमांडर इन चीफ बनले. राजकारण त्यांनी जास्त केले नाही परंतु सामाजिक कार्याचे ते अध्वर्यू होते. समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र तीन हजार रुपये प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुण्यात युवक परिषद भरवली गेली ती पुणे जिल्ह्यासाठी किंवा शहरासाठी नव्हती. त्यात संबंध महाराष्ट्रातील प्रतिनिधी आले होते. 1939 साली कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून गेले. त्याचे श्रेय बाऊसाहेब रणपिसे यांचेकडे ओघानेच जाते.

महात्मा गांधी यांनी पुण्यात उपवास केला त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेसमध्ये होता. त्यावेळी रणपिसे यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते. अशा रीतीने ते एक समाजसेवाच करत होते.

पहिली जयंती

डॉ बाबासाहेब यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम 14 एप्रिल 1928 रोजी रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले. बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.

यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली. 24 ऑगस्ट 1958 रोजी रणपिसे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लोकराज्यच्या एप्रिलच्या अंकातून साभार, लेखक – मिलिंद मानकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे संग्राहक)