आकाश-४ या भारताच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बराच खल केल्यानंतर अखेर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्रालयाने मंजुरी दिली आहे. अत्यंत कमी किंमतीच्या आकाश – ४ या टॅब्लेटची निर्मिती करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या परवानगीची गरज असून, मंत्रीमंडळाद्वारे त्याबाबतची सूचना लवकरच जारी करण्यात येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नव्या प्रस्तावानुसार २२ लाखांहून अधिक आकाश-४ टॅब्लेटची निर्मिती केली जाणार असून त्यासाठी सुमारे ३३० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पुरवठा महासंचालनालयातर्फे हा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आकाश-४ टॅब्लेट देशातील सर्व अभियांत्रिकी संस्थांना देण्यात येणार आहे. त्यांची खरेदी महासंचालनालयातर्फे अनुमोदित केलेल्या विक्रेत्यांकडून केली जाणार आहे. टॅब्लेट प्रत्येक विद्यार्थ्यांला अनुदानित दराने दिला जाणार आहे. यासाठी प्रत्येक टॅब्लेटला ३५ डॉलर इतका खर्च अपेक्षित आहे.
दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या जानेवारी महिन्यापर्यंत आकाश-४ वितरणासाठी तयार असेल. गेल्याच महिन्यात भारताच्या महालेखापांलांनी आकाश-४ प्रकल्पासाठी आयआयटी जोधपूरवर सर्व जबाबदारी सोपविण्यात आल्याबद्दल केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते. तसेच, असा निर्णय घेताना त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता त्या संस्थेत आहे किंवा नाही याची खातरजमा न करता असे आदेश दिल्यास त्याचा प्रकल्पावर विपरीत परिणाम होईल, असेही नमूद केले होते.