नासाच्या हबल व स्पिटझर दुर्बिणींच्या मदतीने प्राचीन काळातील एक दीर्घिका शोधण्यात आली असून ती अजूनही बाल्यावस्थेतच असल्याचे दिसून आले आहे. या बटू दीर्घिकेचे नाव ‘तायना’ असून त्याचा अर्थ बाल (लहान) असा आहे. महाविस्फोटानंतर ४० कोटी वर्षांपूर्वी ही दीर्घिका जन्माला आली होती.

दक्षिण अमेरिकेतील अँडीस व अल्टीप्लानो येथे बोलल्या जाणाऱ्या अयमारा भाषेत तायनाचा अर्थ प्रथम जन्मलेली असा होतो. तायना ही मॅग्लेनिक ढगाइतकी मोठी असून दोन दुर्बिणींनी केलेल्या निरीक्षणानुसार या दीर्घिकेतील ताऱ्यांच्या जन्माचा वेग दहा पटींनी जास्त आहे. प्राचीन असलेली ही दीर्घिका बाल्यावस्थेत असून खगोलवैज्ञानिकांनी म्हटल्यानुसार तिच्या गाभ्याचाच अभ्यास करणे शक्य झाले आहे. स्पिटझर व हबल दुर्बिणीने प्राचीन दीर्घिका शोधण्याची ही पहिलीच वेळ नाही पण दोन्ही दुर्बिणींनी एकच दीर्घिका शोधण्याची ही पहिलीच वेळ आहे. हबल व स्पिटझर यांनी खूप लांब अंतरावरच्या दीर्घिका यापूर्वी शोधल्या आहेत पण आताची दीर्घिका एका ठिपक्यासारखी फिकट दिसते आहे, आतापर्यंत ती निरीक्षणातून सुटली होती, त्यातील कमी प्रकाशमान घटक हे अजूनही बाल विश्वाचे अवशेष बाळगून आहेत, त्यामुळे पहिल्या दीर्घिका कशा तयार झाल्या, यावर नवा प्रकाश पडणार आहे. अगदी फिकट अशा घटकांचे गुणधर्म या वेळी तपासले जात आहेत, असे पाँटिफिकल कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ चिलीचे मुख्य संसोधक लिओपोल्डो इनफँटी यांनी सांगितले. विश्वाच्या निरीक्षण योग्य क्षितिजावर असलेल्या २२ दीर्घिका शोधल्या गेल्या असून त्या तरुण आहेत पण ही दीर्घिका मात्र   बाल्यावस्थेत आहे. मॅग्लेनिक ढगापेक्षा ही दीर्घिका दहा पट वेगाने ताऱ्यांची निर्मिती करीत आहे. दीर्घिकेच्या गाभ्याची निर्मिती तेथे चालू आहे. ही दीर्घिका फिकट प्रकाश बाहेर टाकणारी असली, तरी सध्या ती एका विशिष्ट अवस्थेत असल्याने हबल दुर्बिणीला दिसू शकली, आताच्या अवस्थेत तिचा प्रकाश वीस पट अधिक भासत आहे अन्यथा ती दिसली नसती. या दीर्घिकाच्या अवरक्त रंगपटाचा अभ्यास केल्यानंतर तिचे वय व अंतर सांगता येईल. प्राचीन काळातील दीर्घिका या रंगाने जास्त लालसर असतात कारण त्या आपल्यापासून जास्त वेगाने दूर जात असतात. तायनाचा प्रकाश मूळ निळा किंवा पांढरा आहे व ती आपल्यापासून दूर जात आहे. खगोलवैज्ञानिकांनी नैसर्गिक भिंगांच्या मदतीने ती शोधली आहे पण मानवाने निर्माण केलेल्या शक्तिशाली भिंगांच्या मदतीने अशा अनेक दीर्घिका शोधणे शक्य आहे, त्या विशिष्ट अवस्थेत नसल्या, तरी त्यांचा शोध घेणे कठीण नाही. सध्या बांधणी चालू असलेली जेम्स वेब दुर्बिण अशा अनेक बाल दीर्घिकांचा शोध लावू शकेल व त्यामुळे आपल्याला विश्वाच्या निर्मितीवेळच्या दीर्घिकांची माहिती उपलब्ध होईल. या दीर्घिकेचा शोध एमएसीएस जे ०४१६.१-२४०३ या दीर्घिकासमूहाचे निरीक्षण करताना लागला असून हा समूह ४ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे व त्याचे वस्तुमान सूर्याच्या काही अब्ज पट आहे. या तारकासमूहाच्या मागे असलेल्या दीर्घिकांचा प्रकाश गुरुत्वीय भिंग तंत्रामुळे वाकतो व तो वाढतो त्यामुळे तायनाचा शोध लागू शकला.