|| राजेंद्र येवलेकर

२०१७ मधील गोष्ट आहे. त्या वेळी माझे आजोबा दिल्लीतील भयानक वायू प्रदूषणामुळे आजारी पडले. त्यांची ती स्थिती मला पाहवत नव्हती, तरी वयापलीकडे जाऊन विचार करणे हातात होते. त्यातूनच तुम्ही आता पाहात आहात तो अभिनव फिल्टर तयार झाला आहे. त्याच्या मदतीने तुम्ही केवळ हवा प्रदूषणापासूनच बचाव करू शकत नाही तर अगदी रासायनिक वायूचा हल्ला जरी तुमच्यावर कुणी केला तरी पूर्वसूचना मिळते, अमिटी इंटरनॅशनल या दिल्लीतील पुष्पविहार येथील शाळेत शिकणारा शिवम मुखर्जी सांगत होता. जीवनात अनेक समस्या असतात, त्यातील काहींवर विज्ञानाने मात करता येते हेच जणू तो वेगळा विचार करणारा मुलगा सांगत होता. त्याच्या या नवप्रवर्तनाला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक अखिल भारतीय विज्ञान संमेलनात देण्यात आले.

नवभारत निर्माण योजनेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत ज्या मुलांना पारितोषिके  मिळाली त्यांच्यात केवळ प्रकल्प म्हणून काहीतरी करण्याची प्रेरणा नव्हती, बक्षीस मिळवणे हा हेतू नव्हता, तर  जीवनातील समस्येवर उत्तर शोधायचे हाच एक ध्यास होता. शिवमचे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर तर आई गृहिणी. नेहमी आपण तोंडाला जो मास्क लावतो त्याचा काही उपयोग नसतो, कारण त्यातून आपण हवा आत घेऊ  शकत नाही. त्यामुळेच शिवमने त्याच्या वयाच्या मानाने खूपच प्रगत फिल्टर शोधला आहे. त्याचे भाग आहेत मास्क, कॉलर व जॅकेट. मास्कमुळे हवा गाळली जाते, पण त्यातील कॉलर नावाचा भाग तुम्हाला ताजी हवा मिळवून देतो. त्यानंतर तिसरा भाग आहे तो जॅकेटचा. त्यात सेन्सर आहे म्हणजे हवा खूपच प्रदूषित असेल तर धोक्याचा दिवा लागतो, अशा वेळी ऑक्सिजनची लहान सिलडर्स सुरू होतात ती धोक्यातून बाहेर पडेपर्यंत पुरतात. शिवम आत्मविश्वासाने सांगत होता. विशेष म्हणजे त्याने यात तीन स्तरांचे फिल्टर वापरले असल्याने कितीही सूक्ष्म प्रदूषक कण आत जाऊ  शकत नाहीत. व्हॅसलिनमध्ये बुडवलेली जाळी, पाण्याच्या बुडबुडय़ांवर आधारित कार्बन फिल्टर यात आहेत, शिवाय युव्ही फिल्टरचा वापर प्रथमच हवा गाळण्यासाठी केला आहे. तो वापरताना कंपन संख्या ० ते ५० हर्ट्झ एवढी वापरली आहे. या फिल्टरचे वजन १ ते २ किलो आहे. ते दहा ग्रॅमवर आणता येईल असे शिवम सांगतो, कारण त्यात अतिशय वेगळी सामग्री वापरता येईल. यात अरोमा चेंबरही आहे, त्यामुळे नीलगिरी टाकून वाफाराही घेण्याची सोय आहे. जॅकेट सोडले तर त्याची किंमत ७०० रुपये तर जॅकेटसह १० हजार रुपये आहे, पण सामान्य परिस्थितीत पहिले दोन भागच गरजेहून अधिक पुरेसे आहेत. याची किंमत २ ते ५ हजारांपर्यंत खाली आणता येईल असे शिवम सांगतो. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक याच शाळेचे जसकरण सिंग छाबडा व सिद्धार्थ साहू यांना मिळाला आहे. त्यांनी अंध व कर्णबधिर अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी स्मार्ट काठी तयार केली आहे. जसकरणने सांगितले, की नेहमी आपण अंध लोक काठी वापरताना पाहतो, पण ती परिपूर्ण नाही. त्यात त्यांना समोरून काही येत असेल तर कळत नाही. आम्ही जी काठी तयार केली आहे तिचे वेगळेपण म्हणजे त्यात रस्त्यातील अडथळा कळतो. त्यात अल्ट्रॉसॉनिकचा वापर केला आहे. यात जीपीएस प्रणालीही वापरली असल्याने हरवायचा प्रश्न नाही. या काठीची किंमत सातशे रुपयांहून अधिक असली तरी त्यात सुधारणा करून ती कमी करता येणार आहे. या मुलांना अटल टिंकरिंग लब या केंद्राच्या उपक्रमातून वेगळा विचार करायची सवय लागली त्याचे ही काठी म्हणजे फलित आहे .

तिसरा पुरस्कार मिळवणाऱ्या खुशबू गुप्ता व शगुन जैन यांनी जैवविघटनशील प्लास्टिक (स्टार्च) पासून सॅनिटरी नॅपकीन तयार केले आहेत. त्यांची किंमत आहे ५ रुपये, पण ती सव्वा रुपयापर्यंत खाली आणता येईल. कमी व जास्त रक्तस्राव होणाऱ्या महिलांना वापरता येणारे हे नॅपकीन आहेत. काव्या जोशी व आयुषी कौशिकी या मुलींनीही सॅनिटरी नॅपकीन तयार केले असून ते कापडाचे आहेत, त्यात जे जेल वापरले आहे. ते ग्रामीण भागातही उपलब्ध आहे.

असेही जुगाड, पण युक्ती शंभर नंबरी

झेबा अंजुम व दीक्षा मिश्रा या मुलींनी नाकाला लावण्याचा फिल्टर तयार केला आहे. म्हणायला तो जुगाडसारखा असला तरी त्यात महागडे काहीच नाही. कोकची प्लास्टिक बाटली तोडून त्यात चुना, स्पंज, पॉलिस्टर असे तीन फिल्टर आत लावले आहेत. यातून एक कणही आत जाऊ  शकत नाही, फक्त शुद्ध हवा तेवढी मिळते. यातील चुना प्रदूषके शोषतो, स्पंज धूलिकण ओढून घेतो, तर पॉलिस्टरमुळे सूक्ष्म कणही आत जाऊ  शकत नाहीत. अशा या स्पर्धातून वेगळा विचार करण्याची सवय लागते. शिवाय उद्याचे वैज्ञानिक-उद्योजक यातच लपलेले आहेत, त्याचा हा शोध प्रवास इतरही उत्तेजनपर पुरस्कारातून उलगडत गेला.