भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांच्या नजरकैदेत वाढ झाली आहे. हैदराबाद उच्च न्यायालयाने बुधवारी वरवरा राव यांची नजरकैद आणखी तीन आठवडयांसाठी वाढवली आहे. वरवरा राव यांच्यावर नक्षलवादी संघटनांशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

नक्षलवादी संघटनांच्या केंद्रीय समितीचा प्रमुख चंद्रशेखर हा वरवरा राव यांच्याशी ईमेलद्वारे संपर्कात होता. नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिग, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि महेश राऊत यांना अटक केल्यानंतर ४ जुलै रोजी चंद्रशेखर यांनी ईमेलद्वारे चिंता व्यक्त केली होती, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उज्वला पवार यांनी विशेष न्यायालयात दिली होती.

संशयितांच्या अटकेनंतर नक्षलवादी संघटनांचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असून त्यादृष्टीने काही पाऊले उचलावी लागणार आहेत. नक्षलवादी संघटनांची केंद्रीय समिती भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे चंद्रशेखर यांनी वरवरा राव यांना पाठविलेल्या ईमेल संदेशात स्पष्ट केले आहे, असे अ‍ॅड. पवार यांनी युक्तिवादात नमूद केले होते.