उस्मानिया विद्यापीठात १० डिसेंबर रोजी होणारा गोमांस महोत्सव रोखण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असणाऱ्या ‘ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’ने हा महोत्सव आयोजित केला आहे.
पोलिसांचा इशारा आणि विद्यापीठ प्रशासनाने नाकारलेली परवानगी यांना न जुमानता कुठल्याही परिस्थितीत हा महोत्सव साजरा केला जाणार असल्याचे या संघटनेचा सदस्य शंकर याने सांगितले. तसेच, याच काळात आणखी एक विद्यार्थी संघटना वराहमांस (पोर्क) महोत्सवदेखील आयोजित करणार आहे. हा महोत्सव होऊ नये, यासाठी विद्यापीठ आवारात वाढीव पोलीस तुकडय़ा तैनात करण्यात येणार आहेत. विद्यापीठात सर्व प्रकारच्या उत्सवांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही महोत्सवाला परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली, तर संबंधितांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. शैक्षणिक कार्यक्रम वगळता इतर कुठलाही कार्यक्रमास परवानगी देणार नसल्याचे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.