एकीकडे देशातील प्रत्येक नागरिक करोनावरील लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी काल परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. तर, देशभरात आज ड्राय रनचं आयोजन करण्यात आलं आहे. हे सगळं एककीडे घडत असताना दुसरीकडे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचं एक खळबळजनक विधान समोर आलं आहे.

“मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही. असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.” एएनआयने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

दरम्यान, अगोदर देशभरात मोफत लस दिली जाणार असल्याचे सांगणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आता आपल्या शब्दांवरून घुमजाव केल्याचं दिसत आहे. देशभरात लस मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर आरोग्य मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत डॉ. हर्षवर्धन सारवासारव केली आहे. “लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. देशभरात लस पुरवली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी व २ कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील २७ कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल, याचा तपशील जुलैपर्यंत निश्चित केला जाणार आहे,” असं आरोग्यमंत्र्यांनी आता सांगितलं आहे.

करोना लस मोफत नाही, ‘त्या’ घोषणेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं घुमजाव

तर, “देशातील नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे,” असं देखील आरोग्यमंत्र्यानी लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन केलं आहे.