सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला
पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी त्यांची शनिवारी भेट घेतली. मात्र, त्यापूर्वी त्यांना पोलिसांनी वाटेतच रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून बराच गदारोळ झाला. या घटनेवर वेगवेगळी मत व्यक्त केली जात असून, प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “प्रियंका मला तुझा अभिमान आहे. तू जे केलं आहे, ते बरोबर आहे आणि दुःखात असलेल्या लोकांना भेटणं कोणताही गुन्हा नाही,” असं वढेरा यांनी म्हटलं आहे.

लखनऊ येथील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापूरी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केला म्हणून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्रियंका गांधी-वढेरा यांनी त्यांची शनिवारी भेट घेतली. मात्र, त्यांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून प्रियंका यांना थांबवण्याची प्रयत्न झाले. यावरून बराच गोंधळही झाला. या घटनेवर त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी मोटारसायकलवरून जातानाचा प्रियंका गांधी यांचा व्हिडीओ ट्विट करून भूमिका मांडली आहे.

प्रियंका गांधीविषयी वढेरा काय म्हणाले ?

तुझ्यातील दयाळू भाव आणि गरज असणाऱ्या लोकांसाठी धावून जाण्याच्या स्वभावामुळे प्रियंका मला तुझा अभिमान वाटतो. तू जे काही केलं आहेस, ते बरोबर आहे. जी माणसं अडचणीत असतात, त्यांच्यासोबत असणं कोणताही गुन्हा नाही. प्रियंकाला महिला पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्यानं मला वाईट वाटलं. एका महिला पोलिसाने तिचा गळा पकडला, तर दुसरीनं धक्का दिला. त्यामुळे ती खाली पडली. पण, तिचा निर्धार कायम होता. तिनं मोटारसायकलवरून प्रवास करून सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबाची गळाभेट घेतली,” असं वढेरा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शनिवारी नेमकं काय घडलं?

प्रियंका गांधी या एस.आर. दारापूरी यांची भेट घेण्यासाठी जात असतानाच लखनऊ पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांसोबत त्यांची झटापटही झाली. त्यानंतरही प्रियंका गांधी यांनी दारापूरी यांच्या कुटुंबांची बेट घेतली. मात्र, यावरून उत्तर प्रदेशचं राजकारण तापलं आहे. “मी कारमधून शांततेने जात होते. तिथे शांतता भंग होण्याचा प्रश्नच नाही. माझ्यासोबत तीनपेक्षा जास्त कार्यर्तेही नव्हते. मला थांबवलं. पायी चालत असताना महिला पोलिसांनी मला पकडलं. माझा गळा दाबला. धक्काबुक्कीही केली,” असं प्रियंका गांधी घटनेनंतर म्हणाल्या होत्या.