भारतात परतलो तर लोकांच्या जमावाकडून मारहाण होईल अशी भीती वाटते आहे. या भीतीमुळेच भारतात परतणे धोकादायक वाटते आहे असे मेहुल चोक्सीने म्हटले आहे. पीएनबी घोटाळ्यात नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू करण्यात आले आहे. हा वॉरंट रद्द व्हावा म्हणून सीबीआय कोर्टात मेहुल चोक्सीने अर्ज दाखल केला आहे. मी भारतात आलो तर लोकांचा जमाव मला सोडणार नाही, मारहाण करेल. ही मारहाण एवढी जबरदस्त असेल की त्यातच माझा मृत्यू होईल अशी भीती वाटत असल्याचे मेहुल चोक्सीने म्हटले आहे.

भारतात एखाद्या प्रकरणात दोषी सापडलेल्या माणसाला जमावाकडून मारहाण करण्यात येते, अशा काही घटना गेल्या काही दिवसात उघड झाल्या आहेत. मला अशा घटनेत सापडून मरायचे नाही, असेही मेहुल चोक्सीने म्हटले आहे. १२ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा करून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे फरार झाले आहेत. भारतातील अनेक लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे म्हणून परतण्यास भीती वाटते असे मेहुल चोक्सीने सांगितले.

मेहुल चोक्सीने त्याचे वकिल संजय अबॉट आणि राहुल अग्रवाल यांच्या मदतीने कोर्टात अजामीनपात्र वॉरंट रद्द केले जावे यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मेहुल चोक्सीने भारतातील मॉब लिंचिंगच्या प्रकरणांची उदाहरणे देत याच भीतीने भारतात येण्यास भय वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच माझी तब्बेत बरी नसल्याचेही मेहुल चोक्सीने म्हटले आहे. तसेच तपास यंत्रणा माझ्यासोबत भेदभाव करत आहेत असाही आरोप मेहुल चोक्सीने केला आहे.