मी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही भेटलो नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटलो नाही. तरीही मंत्रीपद मिळवले आहे, त्यामुळे मंत्रीपद कसे मिळवायचे हे माझ्याकडून शिका असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे उद्गार काढले आहेत. रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाने लोकसभा निवडणुकीत कोणतीही जागा लढवली नाही. आपल्या पक्षाला एक जागा मिळावी म्हणून आठवलेंनी आग्रह धरला होता. मात्र एकही जागा दिली गेली नाही. आठवले यांना मंत्रीपद मात्र मिळालं. याबाबत बोलताना आठवले म्हटले की मंत्रीपद कसं मिळवायचं हे माझ्याकडून शिका!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. याबाबत आठवलेंना विचारले असता ते आठवले म्हटले की शरद पवार यांनी आता काँग्रेससोबत राहू नये. त्यांनी आता एनडीएत आलं पाहिजे. शरद पवार यांची पॉवर काँग्रेसपेक्षा जास्त आहे. मी इथे आहे तर शरद पवार तिथे काय करत आहेत? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

उद्धव ठाकरे एकदा काय दहावेळा अयोध्येला गेले तरीही राम मंदिर होणार नाही असं वक्तव्य रामदास आठवलेंनी नुकतंच केलं. त्याबाबत विचारलं असता मंदिर व्हावं हे माझंही मत आहे. मात्र ते कायदेशीर पद्धतीने झालं पाहिजे असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.