MeToo प्रकरणात परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी पत्रकार एम. जे अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.  त्यातीलच एका प्रकरणी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी बदनामीचा खटला दाखल केला होता. त्याप्रकरणी शनिवारी अकबर यांचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले. या वेळी न्यायालयात जवळपास दोन तास शाब्दिक चकमक उडाली.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्यासमोर अकबर हजर झाले, रमाणी यांनी केलेले आरोप बदनामीकरक असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. रमाणी या दी एशियन एज या वृत्तपत्रामध्ये रुजू झाल्या, त्याबाबतच्या सविस्तर तपशिलावरून रमाणी यांच्या वकील रिबेका जॉन यांनी अकबर यांची उलटतपासणी घेतली. मात्र अकबर यांनी बहुसंख्य प्रश्नांना, आपल्याला आठवत नाही, असे उत्तर दिले.

रमाणी यांनी अकबर यांच्यावर ते पत्रकार असताना २० वर्षांपूर्वी लैंगिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला, मात्र अकबर यांनी हा आरोप फेटाळला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे.

एम. जे. अकबर हे माजी पत्रकार असून त्यांच्यावर पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात लैंगिक गैरवर्तन केल्याचे तब्बल २० महिलांनी आरोप केले आहेत. या आरोपांमुळे मोदी सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने अकबर यांना आपल्या परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.