ग्रेटर हैदराबाद महानगर पालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे भाजपा खासदार बंडी संजय यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जुन्या हैदराबाद शहरात रोहिंग्या आणि पाकिस्तानी मतदार राहत असल्याचा हवाला देत, ”आम्ही ग्रेटर हैदराबाद महानगर पालिका निवडणूक जिंकल्यानंतर जुन्या हैदराबाद शहरावर सर्जिकल स्ट्राइक करू” असं म्हटलं आहे. यावर आता एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींनी प्रतिक्रिया दिली आहे.

”भाजपाच्या एका नेत्याने सांगितलं की, जर त्यांनी निवडणूक जिंकली तर ते पाकिस्तानी व रोहिंग्यांना बाहेर काढण्यासाठी जुन्या हैदराबादवर सर्जिकल स्ट्राइक करतील. इथं राहत असलेले सर्वजण भारतीय आहेत. मी तुम्हाला २४ तासांचा अवधी देतो, इथं किती पाकिस्तानी राहत आहेत सांगा ” असं ओवेसींनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ओवेसी बंधू हैदराबादचा विकास कधीच करणार नाहीत ते केवळ रोहिंग्या मुस्लिमांना भारतात प्रवेश देतील अशी टीका केल्यानंतर, असदुद्दीन ओवेसी यांनी रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन भाजपाचे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ”जर तुम्ही ३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एवढं सगळं होईपर्यंत झोपा काढत होते का?” असा टोला ओवेसींनी लगावला आहे. सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना ओवेसींनी शाह यांच्यावर निशाणा साधला.

“३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद झाली तेव्हा अमित शाह झोपा काढत होते का?”

एक डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपाने या निवडणुकींसाठी आपली संपूर्ण ताकद लावली आहे. भाजपाचे अनेक नेते या निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहेत. तर दुसरीकडे एआयएमआयएमनेही निवडणुकीचा प्रचार सुरु केला आहे.