भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं दिल्लीमधील एम्स रुग्णालयात कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. स्वराज यांना रात्री साडे नऊ वाजता अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अगदी संध्याकाळपर्यंत त्या लोकसभेच्या कामकाजावर लक्ष ठेऊन होत्या हे त्यांनी केलेल्या शेवटच्या ट्विटमधून दिसून येते.

स्वराज यांनी सायंकाळी ७ वाजून २३ मिनिटांनी कलम ३७० संदर्भात निर्णय घेण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. ‘प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी,’ असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

‘मी माझ्या आयुष्यात याच दिवसाची वाट पाहत होते’ असे शब्द असणारे हे ट्विट स्वराज यांच्या निधनाच्या बातमीनंतर चांगलेच व्हायरल झाले आहे.  काल राज्यसभेमध्ये कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही त्यांनी अभिनंदन केलं होतं.

सात वेळा लोकसभेच्या खासदार राहिलेल्या स्वराज या वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदावर विराजमान झालेल्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी एम्स रुग्णालयाकडे धाव घेतली.