उत्तर प्रदेशमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात मोहीम राबवण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गावातील संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवा. उत्तर प्रदेशला भ्रष्टाचार आणि अपराध मुक्त करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या कार्यशैलीत बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. गुन्हेगारांना राज्यात जागा नाही. त्यांना राज्य सोडण्यास बाध्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बुधवारी बैठक आयोजित केली होती. राज्यात विदेशी नागरिकांचे सर्वेक्षण करा. जे अवैधरित्या राहत आहेत, त्यांना शोधा आणि परत पाठवा, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. राज्याला भ्रष्टाचार आणि अपराध मुक्त करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्यातील विविध भागात डायल-१०० सेवेतंर्गत गस्तीसाठी सुमारे ३२०० वाहनांची सोय करण्यात आली असून यामाध्यमातून पोलिसांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवावी. त्यांनी गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण केली पाहिजे, असे ते म्हणाले.

त्याचबरोबर राज्यातील रेल्वे दुर्घटनांना चाप लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक पाऊल उचलण्याच्या सूचना केल्या. अवैध खाण, तस्करी, पशु तस्करी संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहीम राबवून यात सहभागी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश आदित्यनाथ यांनी दिले.