पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आपला वाढदिवस साजरा केला. देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना अशा शुभेच्छा दिल्या आहेत की, त्यामुळे भाजपा अडचणीत येऊ शकते. ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवत घोष यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ममता यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना घोष म्हणाले की, मी त्यांच्या चांगले आरोग्य आणि आयुष्यात यशस्वी होण्याची प्रार्थना करतो. आमच्या राज्याचे भविष्य त्यांच्या यशावर अवलंबून आहे.

जर एखादा बंगाली पंतप्रधान बनण्याची शक्यता असेल तर मग त्याच असतील. त्यांनी तंदूरूस्त राहून चांगले काम करावे अशी आमची इच्छा आहे. त्या ‘फिट’ राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. घोष यांच्या या वक्तव्यामुळे बंगालच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

ज्योती बसूंकडे पंतप्रधान होण्याची चांगली संधी होती. पण त्यांनी ही संधी गमावली. त्यांच्या पक्षानेच त्यांना पंतप्रधान होऊ दिले आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली. घोष यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. आता भाजपा नेतेही नरेंद्र मोदी पुढचे पंतप्रधान होणार नसल्याचे मान्य करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.