“बाबरी मशीद बेकायदा होती तर ती पाडल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर गुन्हा का दाखल करण्यात आला? आणि ती कायदेशीर होती तर मग ती अडवाणींच्या हिंदूत्ववादी पक्षकारांना का दिली?,” असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं शनिवारी निकाल दिला. या बहुप्रतिक्षित खटल्याचा निकाल देताना वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देऊन, मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर जागा दिली जाईल असं घटनापीठानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयावर ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“एखाद्या व्यक्तीने तुमचे घर तोडले आणि तुम्ही न्याय मागायला गेल्यावर ती जागा ज्याने घर तोडले त्यालाच दिली अन् तुम्हाला घरासाठी दुसरी जागा दिली जाईल असं सांगितल्यास कसं वाटेल?,” असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला. ओवेसी हे सर्वोच्च न्यायलयाचा निकाल मान्य न करता त्याला विरोध करत आहेत अशी टीका करणाऱ्यांचाही ओवेसी यांनी समाचार घेतला. “बाबारी हा आमचा कायदेशीर हक्क आहे. आमची लढाई जमीनीसाठी नाही. आम्हाला दान म्हणून काहीच नकोय. आम्हाला भिकाऱ्यांसारखे वागवू नका. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत,” असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. ते हैद्राबादमधील एका सभेला संबोधित करताना बोल होते.

सर्वोच्च न्यायलायाच्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या काँग्रेसवरही ओवेसी यांनी टीका केली आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लीमांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप ओवेसींनी केला. ‘काँग्रेसच्या कार्यकाळातच मशीदीचे कुलूप उघडून आतमध्ये मुर्ती ठेवण्यात आल्यानेच मी काँग्रेसच्याही विरोधात आहे,’ असं ओवेसी म्हणाले. तसेच समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी या निर्णयाविरोधात आवाज न उठवल्याबद्दल ओवेसींनी प्रश्न उपस्थित केला.

शनिवारी निकाल लागल्यानंतर ओवेसींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही असं मत व्यक्त केलं होतं. “जर बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला असता? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. जमिनीची खैरात नको,” असं ओवेसी म्हणाले होते.

अडवाणींने केले निर्णयाचे स्वागत

“सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने अयोध्याप्रकरणी दिलेल्या ऐतिहासीक निर्णयाचे मनापासून स्वागत करण्यात मी देशवासीयांबरोबर आहे. हा क्षण माझ्यासाठी पूर्णत्वाचा आहे. मला या जन आंदोलनात माझे नम्र योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. भारतीय स्वतंत्रता आंदोलनानंतरचे हे सर्वात मोठे आंदोलन होते,” असे आडवाणी यांनी म्हटले आहे.