लोकसभेसाठी जर युती करायची असेल तर राज्यात आमचा मुख्यमंत्री असायला हवा, असा पुनरुच्चार शिवसेनेकडून पुन्हा एकदा करण्यात आला आहे. त्याचबरोबर येत्या ४८ तासांत जर युतीवर निर्णय झाला नाही तर आम्ही आमच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करु, असा अल्टिमेटम शिवसेनेकडून भाजपाला देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर आता भाजपा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


एएनआयशी बोलताना राऊत म्हणाले, जर २०१९ मध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले तर त्यामध्ये शिवसेना, अकाली दल आणि इतर महत्वाच्या मित्र पक्षांची महत्वाची भुमिका असेल. एनडीएतील हे सर्व मित्रपक्ष त्यांच्या राज्यांमध्ये मजबूत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला केंद्रात युती हवी असेल तर त्या मित्र पक्षांचा मुख्यमंत्री त्यांच्या राज्यात असायला हवा.

माध्यमं जर आम्हाला युतीच्या फॉर्म्युल्याबाबत विचारत असतील तर मी हेच सांगेन की, फॉर्म्युला जर कोणता करायचा झालाच तर १९९५चा फॉर्मुलाच व्हायला हवा, महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ आहे आणि तो राहणारच असेही राऊत पुन्हा म्हणाले. तसेच येत्या ४८ तासात युती न झाल्यास आम्ही आमच्या उमेदवारांचा प्रचार सुरु करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राऊत यांनी एनडीएतील सर्व मित्र पक्षांच्यावतीने हा प्रस्ताव मांडला असला तरी तो त्यांनाही लागू होत असल्याने शिवसेनेचा हा प्रस्ताव नवा नसला तरी पुन्हा त्यांचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या या प्रस्तावावर आता एनडीएतील इतर मित्रपक्ष कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.