आयआयटी दिल्लीतील मॅकेनिकल अभियांत्रिकीचा एक इंजिनिअर सध्या अमेरिकेत हायब्रीड विमान विकसित करण्यात व्यस्त आहे. २०२० च्या प्रारंभी ११०० किमी उड्डाणासाठी व भारतात त्याची विक्री करण्यासाठी ते सज्ज असेल अशी त्याला अपेक्षा आहे.
किर्कलँडचे (वाशिंग्टन) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आशिष कुमार, झुनूम एअरो आधारित हायब्रीड-इलेक्ट्रिक विमान विकसित करत आहे. २०३० पर्यंत त्याची क्षमता १६०० किमी उड्डाण इतकी असेल. विशेष म्हणजे बोईंग आणि जेट ब्ल्यू कंपन्यांनी आशिष यांना समर्थन दिले आहे.

कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी मॅकेनिकल आणि एअरोस्पेस अभियांत्रिकीत पीएच.डी केली आहे. ते म्हणाले, आम्ही सर्वात प्रथम २० आसनांचे हायब्रीड विमान बनवत आहोत. आम्हाला आशा आहे की, पहिल्या दोन वर्षातच पहिला प्रोटोटाइप आकाशात झेप घेईल आणि २०२० च्या प्रारंभी याच्या व्यावसायिक उत्पादनासही सुरूवात होईल.
समाजातील सर्वच स्तराला स्वस्त व वेगवान विमान सेवा आणि १००० मैलाच्या इलेक्टिक एअर नेटवर्कचा विस्तार करण्याचे ध्येय असल्याचे आशिष यांनी सांगितले. आमचे विमान इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त असतील. हायब्रीड विमानामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, असा दावा झुनूम यांनी केला आहे. एअर लाइन कंपन्यांसाठी स्वस्तात देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या हायब्रीड विमानासाठी भारतातून मागणी येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.