हरयाणाच्या मंत्र्यांना लस टोचल्यानंतर करोनाची लागण

 

हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांना करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा दिल्यानंतर करोनाची लागण झाली असली तरी कुठल्याही रुग्णात दुसरी मात्रा दिल्यानंतर चौदा दिवसांनी संबंधित विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचा संबंध लशीच्या पहिल्या मात्रेशी नाही,  असे स्पष्टीकरण कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने दिले आहे.

मंत्री वीज यांना पहिल्या मात्रेनंतर करोनाचा संसर्ग झाला असून लशीची पहिली मात्रा दिल्यानंतर त्यांचा काही व्यक्तींशी संपर्क आला होता.  कंपनीने म्हटले आहे की, लस विकसनात सुरक्षितता हा पहिला महत्त्वाचा निकष आहे. कोव्हॅक्सिनच्या वैद्यकीय चाचण्यांत २ मात्रांचे नियोजन असते. या मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जातात. लशीची परिणामकारकता ही दुसऱ्या मात्रेनंतर चौदा दिवसांनी दिसत असते.

दरम्यान ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून २५ ठिकाणी २६ हजार लोकांना ही लस देण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत दुप्पट यादृच्छिकता वापरली असून त्यात पन्नास टक्के लोकांना लस दिली जाते तर पन्नास टक्के लोकांना औषधी अंश नसलेला ‘प्लासेबो’ हा घटक देण्यात येतो. भारत बायोटेक ही कंपनी कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या अमेरिका व ब्रिटनमध्ये करीत असून कंपनीने ८० देशात ४ अब्ज मात्रा पुरवल्या आहेत त्यांचे सुरक्षा अहवाल चांगले आहेत. भारतातही चाचण्या सुरू आहेत.

प्रतिपिंड बनण्यास अवधी : आरोग्य विभाग  

नवी दिल्ली : हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांना भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ ही लस दिल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला असला तरी त्यांना पहिली मात्रा दिलेली आहे, दुसरी मात्रा देणे अजून बाकी आहे. लस दिल्यानंतर लगेच प्रतिपिंड तयार होत नाहीत. त्यांना २० नोव्हेंबरला पहिली मात्रा दिल्याने प्रतिपिंड तयार झालेले नसावेत असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. वीज यांना तिसऱ्या टप्प्यात स्वयंसेवक म्हणून कोव्हॅक्सिन ही करोनाची लस स्वयंसेवक म्हणून देण्यात आली होती.  शनिवारी आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे की, लशीची दुसरी मात्रा दिल्यानंतर काही दिवसांनी रुग्णात प्रतिपिंड तयार होतात.