आज ट्रम्प यांच्याशी चर्चा; आर्थिक मदत मिळविण्याचे मोठे आव्हान

अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध फारसे चांगले नसताना पंतप्रधान इम्रान खान यांचे येथे आगमन झाले असून या दौऱ्यात ते सोमवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.  द्विपक्षीय संबंधांना ऊर्जितावस्था देण्याचे आव्हान इम्रान यांच्यापुढे आहे. अमेरिकी अध्यक्षांनी वेळोवेळी पाकिस्तानवर टीका करून त्यांची आर्थिक मदत  बंद केली होती.

इम्रान खान (वय ६६) हे सोमवारी व्हाइट हाऊस येथे ट्रम्प यांना भेटणार असून त्यात ट्रम्प हे त्यांना चार शब्द सुनावण्याची शक्यता अधिक आहे. पाकिस्तानी  भूमीतून काम करणाऱ्या दहशतवादी गटांवर निर्णायक तसेच शाश्वत कारवाई करण्याचा आग्रह ट्रम्प धरतील असे सांगण्यात येते.

यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये शेवटचा अधिकृत अमेरिका दौरा केला होता. इम्रान खान हे तीन दिवस अमेरिकेत राहणार असून  ते ट्रम्प यांच्याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे हंगामी प्रमुख डेव्हिड लिप्टन, जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास व परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेणार आहेत.

ट्रम्प यांच्याशी इमरान यांची ओव्हल ऑफिस येथे समोरासमोर चर्चा होणार असून सोमवारी व्हाइट हाऊस येथे पाकिस्तानी शिष्टमंडळासाठी दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनाही इम्रान भेटणार आहेत. इम्रान यांच्या समवेत लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा व आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद हे आहेत. अफगाण शांतता प्रक्रिया, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा व पाकिस्तानला लष्करी मदत पुन्हा सुरू करण्याची पाकिस्तानची मागणी हे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तालिबान व अमेरिका यांच्यातील चर्चा निर्णायक टप्प्यात असताना ही भेट होत आहे. पाकिस्तानी दबावगट स्थापण्यासाठी एका आस्थापनेशी करारही करण्यात आला आहे.

सिंधच्या मुद्दय़ावर मोहीम

इम्रान खान यांच्याशी भेटीवेळी अध्यक्ष ट्रम्प यांनी सिंध प्रांतातील मानवी हक्क उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करावा अशी मागणी करण्यात आली आहे, त्यासाठी मोबाईल फलकांच्या मदतीने मोहीम राबवण्यात आली. अमेरिकेतील १० काँग्रेस सदस्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांना सिंधचा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे. सिंधच्या मुद्दय़ावर इम्रान खान यांच्या दौऱ्यात व्हाइट हाऊस व कॅपिटॉल हील भागात निदर्शने केली जाणार आहेत.

अमेरिकी अधिकाऱ्यांची अनुपस्थिती?

इम्रान खान यांचे अमेरिकेत डलास आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले तेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी व पाकिस्तानी अमेरिकी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. कुरेशी हे आधीच अमेरिकेत गेले आहेत. यावेळी अमेरिकी अधिकारी उपस्थित नसल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमांत रंगली आहे.