पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तीन आठवडयांनी इम्रान खान यांची पंतप्रधानपदी निवड झाली. पंतप्रधानपदाच्या निवडीसाठी पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीमध्ये शुक्रवारी मतदान झाले.

यात इम्रान खान यांनी १७६ मते मिळवून विजय मिळवला. प्रतिस्पर्धी उमेदवार शहाबाज शरीफ यांना ९६ मते मिळाली. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडून येण्यासाठी नॅशनल असेंबलीच्या सदस्याला १७२ मते मिळवावी लागतात. उद्या शनिवारी सकाळी इम्रान खान पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.१५ च्या सुमारास हा शपथविधी सुरु होईल. २५ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला २७२ पैकी ११६ जागांवर विजय मिळाला होता. इम्रान यांनी अन्य छोटया पक्षांचा पाठिंबा मिळवून बहुमताचा आकडा गाठला.
नवज्योत सिंग सिद्धू शपथविधीसाठी पाकिस्तानात

इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी मिळालेल्या अधिकृत निमंत्रणानंतर नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचले आहेत. पाकिस्तानला रवाना होण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू शुक्रवारी अटारी-वाघा बॉर्डरवर पोहोचले. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण एक सदिच्छा दूत म्हणून पाकिस्तानला जात आहोत, जेणेकरुन दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील असं त्यांनी सांगितलं.

पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितलं की, ‘मी एक सदिच्छ दूत म्हणून पाकिस्तानला जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील या अपेक्षेने मी जात आहे’. माजी क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासहित सुनील गावसकर आणि कपील देव यांनाही इम्रान खान यांच्याकडून शपथविधीसाठी निमंत्रण मिळालं आहे.