पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका; कल्याणमध्ये विविध विकास कार्यक्रम

गेल्या चार वर्षांपासून सत्तेवर असलेल्या आमच्या सरकारने ज्या गतीने कामे केली, त्या गतीने गेली ७० वर्षे सत्तेवर असलेल्या सरकारला कामे करता आलेली नाहीत, असा दावा करत विकासकामांसंदर्भात त्यांचे हेतू संशयास्पद असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कल्याणमधील कार्यक्रमात बोलताना केला. आमच्या सरकारसारखा गतिमान विकास करायचा असेल तर त्यासाठी त्यांच्या दोन पिढय़ा जातील, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळून केली.

कल्याण-भिवंडी मेट्रो आणि सिडकोच्या आवास योजनेतील घरांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी कल्याणमध्ये झाले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून भाषणाला प्रारंभ करून संत, राष्ट्रपुरुषांनी पावन झालेल्या महाराष्ट्राचा गौरवाने उल्लेख केला. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. ग्रामीण महाराष्ट्राचे झपाटय़ाने शहरीकरण होत आहे. विकासाचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करून महाराष्ट्राच्या साहाय्याने भारताला जगातील सर्वोत्तम १० शहरांच्या यादीत नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.  देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेला माणूस आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईशी नाळ जोडून आहे. अशा प्रत्येक माणसाची मनोकामना विकासाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. रेल्वे मार्ग विस्तार, मोनो, मेट्रो ही त्याची प्रतीके असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील मेट्रो प्रकल्प २००६ मध्ये मंजूर झाला. तो आठ वर्षे रखडला. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही या प्रकल्पाला गती देऊन १२ किमीचा मार्ग सुरू केला. येत्या तीन वर्षांत ३५ किमी मार्गिकेवर मेट्रो धावेल. सुखकर प्रवासासाठी मेट्रो मार्गाचा अधिकाधिक विस्तार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. २०३५ पर्यंत शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन मेट्रो प्रकल्प विस्ताराची कामे हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक बेघर व्यक्तीला हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. योजनेतील लाभार्थीना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून ९० हजार आर्थिक दुर्बल आणि सामान्य घटकांना घरे देण्याचा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. राज्यात आठ लाख घरे तयार करण्याची कामे सुरू आहेत.

नवीन मेट्रो मार्गाना मंजुरी

डोंबिवली ते तळोजा, मिरा-भाईंदर ते वसईपर्यंतच्या नवीन मेट्रो मार्ग विस्तारीकरणाला पंतप्रधानांनी मंजुरी दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या नवीन विस्तारित मार्गाचे विकास आराखडे लवकरच तयार करून त्यांना मंजुरी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण मेट्रो मार्ग डोंबिवली ते तळोजापर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली होती या वेळी मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली ते तळोजा या मेट्रो मार्गाची तसेच वसई-विरार आणि नाशिकमध्येही मेट्रोचे मार्ग निर्माण करून एकात्मिक परिवहन प्रणाली विकसित केली जाईल, अशी घोषणा केली. घरबांधणीसाठी ‘ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेन्ट’ धोरणावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.