भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंग या दोघींना आज नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या तुकडीमध्ये प्रवेश देण्यात आला. आता यो दोघीही एयएनएस गरुडा या युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून ऑन बोर्ड काम करतील. ले. कुमुदिनी आणि ले. सिंग या दोघी नौदलाच्या जहाजांवर नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. यापूर्वी केवळ समुद्रकिनाऱ्यांवरुन उडून पुन्हा परतणाऱ्या हेलिकॉप्टरच्या तुकडीमध्ये महिलांचा समावेश केला जात होता.

ले. कुमुदिनी आणि ले. सिंग या दोघी १७ सदस्य असणाऱ्या तुकडीचा भाग आहेत. या गटामध्ये भारतीय नौदलाचे अधिकारी असून त्यापैकी चार महिला अधिकारी, तीन भारतीय तटरक्षक दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना भारतीय नौदलाकडून कोच्ची येथे आयएनएस गरुडावर घेण्यात आलेला ऑबझरव्हर कोर्स पूर्ण केला आहे. यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या या सर्वांना सोमवारी सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाचे काही फोटो एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केले आहेत.

रीअर अ‍ॅडमिरल अँटनी जॉर्ज एन.एम. यांच्या हस्ते सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. जॉर्ज हेच या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख अधिकारी होते. जॉर्ज यांनी पात्र ठरलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं. तसेच या तुकडीच्या माध्यमातून पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचा युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या तुकडीत समावेश करुन घेण्यात येत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचेही जॉर्ज यांनी म्हटलं आहे. यामुळे भविष्यात लढाईच्या काळात युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांना नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गरज पडल्यास तसा विचार करता येईल असंही जॉर्ज म्हणाले.