विमान प्रवासात सध्या मोबाइल बंद ठेवण्याचे किंवा एरोप्लेन मोडवर ठेवण्याचे बंधन आहे. परंतु लवकरच विमानामध्ये नुसता मोबाईलच वापरता येणार नाही तर चक्क वायफाय सेवाही मिळण्याची चिन्हे आहेत. नुकतीच टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीनं विमान प्रवासादरम्यान मोबाईल वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त या सुविधेचा कसा वापर करू देता येईल याचा विचार विमानकंपन्यांनी सुरू केला असून वायफाय सेवा देण्याचा विचारही करण्यात येत आहे. त्यामुळे विमान प्रवास करताना प्रवासी चक्क सेल्फी घेऊ शकतील आणि ते सोशल मीडियावर शेअर करू शकतील. अर्थात, त्यासाठी विमान प्रवासाच्या भाड्याच्या तब्बल 20 ते 30 टक्के इतकं शुल्कही त्यांना भरायला लागण्याची शक्यता आहे.

अत्यंत स्पर्धेच्या अशा विमान वाहतूक उद्योगात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याता प्रयत्न विमान वाहतूक कंपन्या करणार हे निश्चित आहे. त्यासाठी वायफाय सुविधेचाही ते कल्पकतेने वापर करतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे कदाचित लो कॉस्ट किंवा स्वस्तातल्या विमान सेवांमध्ये वायफाय उपलब्ध न होण्याचीही शक्यता आहे.

काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार विमानामध्ये नेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अर्ध्या ते एका तासासाठी एका व्यक्तिसाठी साधारणपणे 500 रुपये ते एक हजार रुपये इतकं शुल्क असू शकेल. हे दर आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तसेच दूरसंचार कंपन्या सॅटेलाइट्सच्या स्लॉट्समध्ये किती शुल्क घेतात यावर आधारीत असेल. देशांतर्गत लो कॉस्ट एअरलाइननी प्रवास करताना दीड ते दोन हजार रुपयांपासून विमान तिकिट मिळतं, त्यांच्यासाठी हे दर खूपच महागडे ठरू शकतात. या सुविधेचा दुसरा फायदा आंतरराष्ट्रीय विमान सेवांना होणार आहे. आधी भारतीय हवाई हद्दीत आल्यावर आंतरराष्ट्रीय विमानांना वायफाय सेवा बंद करावी लागत होती, आता ती गरज भासणार नाही.

अर्थात, वायफाय सेवा सुरू करण्याआधी मागणी किती आहे, अँटेना व अन्य यंत्रणा उभारण्याचा खर्च किती आहे अशा बाबींची सध्या चाचपणी करण्यात येत आहे. बिझिनेस क्लासचे जास्त पैसे खर्च करणारे ग्राहक वगळता अन्य कुणी महागडी वायफाय सेवा घेईल का अशी शंकाही आहे.