संसदेमध्ये आज घसरत चाललेल्या जीडीपीच्या मुद्यावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना लोकसभेतील भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुक्ताफळे उधळली. जीडीपीचा जास्त उपयोग होणार नाही असे विधान त्यांनी केले. “जीडीपी १९३४ साली आला. त्याआधी जीडीपी वैगेर काही नव्हता. फक्त जीडीपीला बायबल, रामायण किंवा महाभारत मानून काहीही साध्य होणार नाही. भविष्यात जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही” असे निशिकांत दुबे म्हणाले.

“आजच्या नव्या थिअरीनुसार सर्वसामान्य माणसाचा दीर्घकालीन आर्थिक विकास होतोय की, नाही ते महत्वाचे आहे. दीर्घकालीन विकासाबरोबर लोक आनंदी आहेत की, नाही ते जीडीपीपेक्षा जास्त महत्वाचे आहे ” असे निशिकांत दुबे संसदेत आपल्या भाषणात म्हणाले. मागच्या आठवडयात जीडीपीचे आकडे जाहीर झाले.

विकास दर पोहोचला ४.५ टक्क्यांवर
देशाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटून ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षात विकास दर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्के होता. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. तरीही विकास दराला गती मिळू शकलेली नाही. कृषी, उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमध्येही घट झाली आहे.

दुसऱ्या तिमाहीत मायनिंगमध्ये ०.१ टक्के, बांधकामात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्के, उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन एक टक्का, सर्व्हिस सेक्टर ७.३ टक्क्यावरुन ६.८ टक्क्यापर्यंत घट झाली आहे. विकास दरात सातत्याने घसरण होत असून बेरोजगारी वाढत आहे. बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्र अडचणीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे.