13 December 2019

News Flash

PNB चा घोटाळा तर हिमनगाचं टोक, पाच वर्षांत झाले 8,670 घोटाळे

पाच वर्षांत 61,260 कोटी रुपयांचा लावला चुना

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेमधल्या नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं देश ढवळून निघाला आहे. किमान 11,300 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा अंदाज आहे. मात्र, हा घोटाळा बँकिंग क्षेत्रामध्ये झालेल्या एकूण घोटाळ्यांपैकी किरकोळ वाटावा असं आकडेवारी सांगते. यापेक्षा एकूण घोटाळ्यांची व्याप्ती जास्त असल्याचं उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने माहिती अधिकारामध्ये रिझर्व्ह बँकेकडून मिळवलेली आकडेवारी धक्कादायक आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये सरकारी बँकांमध्ये 8,670 कर्जघोटाळे झाले असून एकूण 61,260 कोटी रुपयांना बँकांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी मार्च 2017 पर्यंतची असून यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या 11,300 कोटी रुपयांचा समावेश नाहीये.

कर्जघोटाळा म्हणजे ग्राहक बँकांकडून परत न फेडायचा विचार करूनच कर्ज घेतो. म्हणजे कर्ज घेतानाच बँकेला गंडा घालायचा त्याचा मानस असतो. बँकेमधल्या कर्जघोटाळ्यांची व्याप्ती इतकी मोठी आहे की गेल्या एकाच वर्षी 14,900 कोटी रुपयांची थकित कर्जे वाढली आहेत. विशेष म्हणजे थकित किंवा बुडीत कर्जांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं वाढत आहे. 2012 – 13 मध्ये 6,357 कोटी रुपयांच्या थकित कर्जांचे प्रमाण आता वर्षाला 17,634 कोटी रुपये इतके फुगले आहे.

बुधवारी बँक घोटाळ्यांचे एक नवीन प्रकरण भारतीय बाजारात समोर आलं. नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे व बँकेतल्या काही कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने 11,300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे पीएनबीनं मान्य केलं व याचा तपास सरकारी यंत्रणा करत असल्याचं सांगितलं. एकाचवेळी करण्यात आलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं सांगण्यात येत आहे.

हा घोटाळा हे हिमनगाचं टोक असू शकतं आणि प्रत्यक्षात याची व्याप्ती खूप जास्त असू शकते असं मत निषिथ देसाई असोसिएट्स या कंपनीच्या पार्टनर प्रतिभा जैन यांनी व्यक्त केलं आहे. “पुढे काय वाढून ठेवलंय, तेच आपल्याला माहित नाही ही वस्तुस्थिती आहे,” जैन म्हणाल्या.
आर्थिक घोटाळे हे बँकिंग क्षेत्रासमोरचं उभरतं आव्हान असल्याची सूचक टिप्पणी आरबीआयनं एका अहवालात व्यक्त केली होती. कर्ज देताना घ्यायची काळजी या संदर्भात गंभीर त्रुटी राहत असल्याचं व त्यामुळे मोठे घोटाळे होत असल्याचं आरबीआयनं म्हटलं होतं. बँकांनी आपली बुडीत कर्जे, वसुलीची स्थिती उघड करावी असे सांगतानाच अशा थकित किंवा बुडीत कर्जांच्या नावाखाली आर्थिक घोटाळे दडवू नये असा सक्त इशाराही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिला होता. अर्थात, रिझर्व्ह बँकही कठोर राहत नसून खुद्द रिझर्व्ह बँकही आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणे लोकांपुढे उघडी करण्यासंदर्भात बँकांना पाठिशी घालत असल्याची टिका काही तज्ज्ञांनी केली आहे.

रॉयटर्सनं 21 सरकारी बँकांपैकी 20 बँकांकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती, त्यातल्या 15 बँकांनी ही माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँक 389 प्रकरणांसह आघाडीवर असून गेल्या पाच वर्षांत एकूण घोटाळ्यातील कर्जांचा आकडा 6,562 रुपयांच्या घरात आहे. त्याखालोखाल बँक ऑफ बडोदा असून या बँकेला 4,473 कोटी रुपयांना गंडवण्यात आलं आहे. तर 231 घोटाळे करून बँक ऑफ इंडियाला 4,050 कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. स्टेट बँकेमध्ये पाच वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची एकूण संख्या 1,069 असून त्यांनी किती रकमेला गंडा घालण्यात आला याचा आकडा दिलेला नाही. तसेच या 15 बँकांनी या थकित रकमांपैकी किती रुपयांची वसुली आत्तापर्यंत केलीय, हे ही स्पष्ट नाहीये.

जर आताच्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा विचार केला तरी त्याची व्याप्ती इतकीच आहे की अजून जास्ती आहे असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार नीरव मोदीशी संबंधित तीन मुख्य कंपन्यांची झाडाझडती घेण्यात येत असून एकूण 36 उपकंपन्या आहेत. त्यातल्या 17 मुंबईत आहेत तर बाकी अन्य शहरांमध्ये आहेत. या कंपन्यांखेरीज सीबीआय पंजाब नॅशनलच्या बच्चू तिवारी, चीफ मॅनेजर नरीमन पॉइंट, संजय प्रसाद, डीजीएम, मोहिंदर शर्मा, चीफ मॅनेजर व मनोज खरात, सिंगल विंडो ऑपरेटर यांची चौकशी करत आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेचे प्रकरण म्हणजे केवळ एक झलक असून एकूण घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड असण्याची शक्यता व्यक्त होत आहे आणि तपास पूर्ण होईल तेव्हाच घोटाळा नक्की कितीचा आहे ते समजणार आहे.

First Published on February 16, 2018 5:21 pm

Web Title: in past five years there are as much as 8670 frauds in banking system
Just Now!
X