देशभरात गेल्या २४ तासांत आणखी १०३५ जणांना करोनाची लागण झाली असून ४० जणांचा मृत्यू झाल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७५२९ वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या २४२ वर पोहोचली आहे.

देशातील ५८६ रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून तेथे एक लाखाहून अधिक विलगीकरण खाटा आणि अतिदक्षता विभागातील ११ हजार ५०० खाटा करोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी सांगण्यात आले.  सरकारने संचारबंदी आणि अन्य निर्बंध लादले नसते तर १५ एप्रिलपर्यंत देशातीलबाधितांची संख्या ८.२ लाखांहून अधिक झाली असती, असे आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

भारतीयांना आणण्याबाबत याचिका

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावे, ही मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश शनिवारी केरळ उच्च न्यायालयाने दिले. आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले.

मशिदींमध्ये राहणाऱ्या ५२ जणांना करोना

दिल्लीच्या चांदनी महल परिसरातील १३ मशिदींमध्ये वास्तव्य करणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ जणांना करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी बहुसंख्य जण निझामुद्दीन येथील ताबलिगी जमात परिषदेला हजर होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्वाना विविध क्वारण्टाइन केंद्रांमध्ये पाठविण्यात आले आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण देण्याचे आदेश

रुग्णालये अथवा क्वारण्टाईन केंद्रांमध्ये करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना पुरेसे संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असे आदेश गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर, निवासी वसाहतींमध्ये करोनाचा फैलाव करीत असल्याचा, आरोप करण्यात येत असल्याने शाब्दिक खटके उडण्याचे अथवा हल्ले होण्याचे प्रकार घडल्याचे वृत्त आल्याने वरील आदेश देण्यात आले आहेत.