जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढताना दिसत आहे. सामान्य नागरिकांबरोबच संरक्षण क्षेत्रातील जवानांनाही करोनाने विळाखा दिला आहे. मागील २४ तासांमध्ये इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलातील १८ जवान व बॉर्डर ऑफ सिक्युरटी फोर्स (बीएसएफ)चे आणखी ३६ जवान आज करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

सध्या ‘आयटीबीपी’च्या १५१ जवानांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत २७० जवानांनी करोनावर मात केलेली आहे. तसेच,’बीएसएफ’च्या ५२६ जवानांवर उपचार सुरू असून, आज ३३ जवानांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या बीएसएफच्या जवानांची संख्या ८१७ झाली आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांत करोनामुळे चार पोलिसांना जीव गमावावा लागला असून, आणखी ३० पोलिसांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता ५ हजार २०५ वर पोहचली आहे. सध्या १ हजार ७० पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ४ हजार ७१ पोलिसांनी करोनावर मात केली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.

देशभरातील तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ करोनाबाधितांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ लाख ४४ हजार ८१४ जण, उपाचारानंतर रुग्णालायतून सुट्टी देण्यात आलेले ४ लाख ९ हजार ८३ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १९ हजार २६८ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.

करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे.