राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमधील प्रवाशांना आता रेल्वेत चहा, नाश्ता आणि जेवण करण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण, रेल्वे प्रशासनाकडून दरात वाढ करण्यात आलेली आहे. एवढेच नाहीतर रेल्वेचे तिकीट घेतानाच चहा, नाश्ता आणि जेवणाचे पैसेही द्यावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाकडून याबाबत एक परिपत्रक काढण्यात आले आहे.

रेल्वे बोर्डाच्या नव्या दरपत्रकानुसार राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमधील सेकंड क्लासद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चहासाठी आता १० रूपयाऐवजी २० तर स्लीपर क्लासमधील प्रवाशांना १५ रुपये द्यावे लागणार आहेत. तर दुरांतोच्या स्लीपर क्लासमध्ये नाश्ता आणि जेवणासाठी आता ८० रुपायांऐवजी १२० रुपये द्यावे लागणार आहेत. संध्याकाळी मिळणार चहा देखील २० रुपयांऐवजी ५० रुपये होणार आहे. रेल्वेच्या तिकीट प्रणीलात हे नवीन दर १५ दिवसांत अपडेट होणार आहेत. राजधानी एक्सप्रेसमध्ये १४५ रुपयांना मिळणारं जेवण आता २४५ रुपयांना मिळणार आहे. या वाढलेल्या दरांमुळे रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार असल्याचं दिसत आहे. याचबरोबर एक्सप्रेसमध्ये ५० रुपयांना मिळणारे शाकाहारी जेवण आता ८० रुपयांना मिळणार आहे. याशिवाय अंडा बिर्याणी ९० व चिकन बिर्याणी ११० रुपायांना मिळणार आहे.

संध्याकाळच्या चहाबरोबर रोस्टेड नट्स आणि स्नॅक्स, स्वीट्स देखील दिले जात असल्याने सकाळच्या तुलनेत संध्याकाळचा चहा महाग असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या अगोदर २०१४ मध्ये दर बदलण्यात आले होते. आयआरसीटीच्या आग्रहानंतर व बोर्डाच्या शिफारशीनंतर या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.