राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीसाठी भारतात आल्यावर पाकिस्तानने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांसोबत बैठक घेणे योग्य ठरणार नसल्याचे भारताने गुरुवारी पाकिस्तानला सांगितले. फुटीरतावादी नेत्यांसोबत बैठक घेणे दहशतवादाचा संयुक्तपणे बिमोड करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये झालेल्या सामंजस्य चर्चेतील तरतुदींच्या विरोधात असल्याचेही भारताने स्पष्ट केले.
येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर बैठक होते आहे. यासाठी पाकिस्तानकडून तेथील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताझ अझिझ भारतात येत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने काश्मीरमधील फुटीरतावादी गट हुर्रियतच्या नेत्यांना नवी दिल्लीमध्ये बैठकीसाठी बोलावले आहे. यालाच भारताने स्पष्ट शब्दांत विरोध केला. हुर्रियतच्या नेत्यांसोबत बैठक घेणे पूर्णपणे अनुचित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यामध्ये गेल्या महिन्यात रशियात झालेल्या बैठकीनंतर सुरक्षा सल्लागार स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरताझ अझिझ येत्या रविवारी भारतात येणार आहेत.