बालाकोट हल्ल्याबाबत मसूदच्या भावाची ध्वनिफित

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात काहीच नुकसान झाले नाही, असा दावा पाकिस्तान सरकार व त्यांच्या लष्कराने केला असला तरी जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने मात्र भारताच्या हल्ल्यात मोठी हानी झाल्याचे मान्य केले आहे.

जैशचा प्रमुख मासूद अझरचा लहान भाऊ  मौलाना अम्मार याने एका ध्वनिफितीत ही माहिती दिली असून, त्याने म्हटले आहे, की भारताच्या लढाऊ  विमानांनी खैबर पख्तुनवा प्रांतात बालाकोट येथे केलेल्या कारवाईत मोठे नुकसान पोहोचवले आहे. ज्या ठिकाणी जिहादचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात ती इमारतच या हल्ल्यात नष्ट झाली. भारताने पर्वतीय भाग पार करून आमच्या हद्दीत येत इस्लामिक सेंटरवर हल्ला केला. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर एक दिवसाने पेशावर येथील सभेत अम्मार याने ही माहिती दिली. काश्मीरमधील मुसलमानांना मदत करण्यासाठी आम्ही इस्लामिक सेंटर चालवतो. काश्मीरमधील संकट हे आपल्यावरचे संकट आहे हे येथे शिकवले जाते.

भारताने केलेल्या कारवाईत काहीच साध्य झाले नाही असा दावा पाकिस्तान, पश्चिमी प्रसारमाध्यमे करीत असली तरी त्यात अनेक दहशतवादी अड्डय़ांचे नुकसान झाले आहे, असे अम्मार याने सांगितले आहे.

तीसपेक्षा अधिक मृतदेह

काही बातम्यांनुसार जाबा टॉप येथे मोठय़ा संख्येने दहशतवादी उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात ते मारले गेले. स्थानिक लोकांनीही रुग्णवाहिकेतून तीसपेक्षा अधिक मृतदेह त्या दिवशी नेण्यात आल्याचे म्हटले आहे. आयएसआयचे माजी अधिकारी कर्नल सलीम यांनीही या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या छावण्यांचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे.

‘जैश’च्या कारवायांमुळे दोन वेळा युद्धजन्य स्थिती

पाकिस्तानातील जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेच्या गझवा ए हिंद म्हणजे भारताविरोधातील युद्धामुळे भारत व पाकिस्तान या दोन देशांत वीस वर्षांत किमान दोनदा युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

गेल्या वीस वर्षांत जैशने केलेल्या भीषण हल्ल्यात पठाणकोट हल्ला, उरी हल्ला, बदामीबाग कॅन्टोन्मेंटवरचा हल्ला व जम्मू काश्मीर विधानसभेवरचा बॉम्बहल्ला यांचा समावेश आहे. भारत व पाकिस्तान या दोन देशांत जैशमुळे सुरुवातीला २००१ मध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती, कारण त्या वेळी त्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. त्यानंतर अलीकडे १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनांवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतरही तशीच परिस्थिती ओढवली.

जैश ए महंमद या संघटनेचे अल कायदाशी संबंध असून २७ नोव्हेंबर २०१७ रोजी ओकारा जिल्हय़ात झालेल्या एका बैठकीत गझवा ए हिंद सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. भारत-पाकिस्तान संबंधात काहीही घडले तरी कारवाया सुरू ठेवायच्या असे जैशचे धोरण होते.

जैश ए महंमदचे अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन यांच्याशी संबंध होते. २४ डिसेंबर १९९९ रोजी आयसी ८१४ या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले त्या वेळी प्रवाशांच्या बदल्यात ३१ डिसेंबर १९९९ रोजी मौलान मासूद अझरची भारतीय तुरुंगातून सुटका करण्यात आली होती, त्यानंतर पाकिस्तानात परत येताच त्याने जैश ए महंमद या संघटनेची स्थापना केली. अझरच्या बरोबर तेव्हा ओमर शेखचीही सुटका करण्यात आली होती. त्यानंतर शेख याचा दी वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या जानेवारी २००२ मध्ये करण्यात आलेल्या हत्येत सहभाग होता. अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्यासाठी त्याने १ लाख डॉलर्सची मदतही दिली होती. जैशने काश्मीर खोऱ्यात अनेक हल्ले केले. एप्रिल २००० मध्ये तीस सैनिकांना स्फोट घडवून मारले होते, तर जून २००० मध्ये बाटमालू येथे बसस्थानकावर तीन पोलिसांना ठार मारले होते. १ ऑक्टोबर जम्मू काश्मीर विधानसभेवर करण्यात आलेल्या हल्ल्यात ३१ जण मारले गेले होते. १३ डिसेंबर २००१ रोजी भारताच्या संसदेवर करण्यात आलेल्या हल्ल्यात नऊ सुरक्षा जवान ठार झाले होते. ओसामा बिन लादेन जेव्हा तोराबोरा येथे लपला होता त्या वेळी जैशने त्यांच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आणले होते. त्यानंतर लष्कर ए तोयबा ही नवीन दहशतवादी संघटनाही स्थापन केली. उरी येथे जैशने केलेल्या हल्ल्यात १८ सप्टेंबर २०१६ रोजी १७ सैनिक हुतात्मा झाले तर ३० जण जखमी झाले होते. पुलवामा येथील हल्ल्यात १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान ठार झाले होते.