News Flash

पाकिस्तानच्या अध्यक्षपदी ममनून हुसैन

पाकिस्तानचे बारावे अध्यक्ष म्हणून जन्माने भारतीय असणाऱ्या ममनून हुसैन यांची निवड झाली आहे. हुसैन हे पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षाचे असून ते नवनिर्वाचित पंतप्रधान

| July 31, 2013 01:00 am

पाकिस्तानचे बारावे अध्यक्ष म्हणून जन्माने भारतीय असणाऱ्या ममनून हुसैन यांची निवड झाली आहे. हुसैन हे पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षाचे असून ते नवनिर्वाचित पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय मानले जातात.
येत्या सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानचे मावळते अध्यक्ष असफ अली झरदारी यांच्याकडून हुसैन सूत्रे हाती घेतील. या अध्यक्षीयपदाच्या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे उमेदवार म्हणून निवृत्त न्यायमूर्ती वाजीउद्दीन अहमद, ममनून हुसैन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे रझा रब्बानी अशा तीन उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र निवडणुकीच्या तारखांमध्ये आयत्या वेळी बदल केल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या रझा रब्बानी यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे प्रत्यक्ष लढत दोघांमध्येच झाली.
जवळजवळ एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत हुसैन यांनी अहमद यांचा धुव्वा उडवला.

पाकिस्तानचे अध्यक्षपद
पाकिस्तानातील अध्यक्षाचे अधिकार लक्षात घेता हे तसे नामधारीपद म्हणूनच गणले जाते. अनेक निर्णय घेण्याचे अधिकार वरकरणी दिसत असले तरीही निर्णयांसाठी पंतप्रधानांचा सल्ला आणि मान्यता मिळवावी लागते. मात्र असे असले तरीही तीनही सेनादलांचा प्रमुख म्हणून अध्यक्षीयपदावरील व्यक्ती कार्यभार सांभाळते. पंतप्रधानांच्या मान्यतेवरूनच सर्व महत्त्वाच्या पदांवरील नेमणुका अध्यक्ष करू शकतात. केवळ शिक्षेत सूट किंवा दया अर्जाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार अध्यक्षांना असतात. मात्र त्यासाठी पंतप्रधानांनी विनंती करणे गरजेचे असते.

अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया
पाकिस्तानच्या अध्यक्षीयपदासाठी राष्ट्रीय कायदेमंडळ, सिनेट आणि पंजाब, सिंध, बलुचिस्तान व खैबर पख्तनुवाला या चार राज्यांच्या कायदेमंडळांचे सदस्य मतदान करतात. प्रत्येक राज्याच्या कायदेमंडळाला ६५ मते ठरवून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक विधिमंडळ सदस्याच्या मताचे मूल्य बदलते राहते. राष्ट्रीय कायदेमंडळातील ३४० सदस्य, सिनेटचे १०४ सदस्य आणि अन्य राज्यांचे मिळून ७०४ सदस्य अशांनी या निवडणुकीत मतदान केले. बदललेले संविधान आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आदेश यांच्या आधारे या अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या.

अध्यक्षपदाचा इतिहास
पाकिस्तानला आजवर ११ अध्यक्ष लाभले असून त्यापैकी पाच हे लष्करप्रमुख होते. लष्करप्रमुखांपैकी चार जणांनी उठावाद्वारे सत्ता हस्तगत केली होती.

हुसैन यांची पाश्र्वभूमी
मामनून हुसैन यांचा जन्म १९४० साली भारतातील आग्रा या शहरात झाला. मात्र १९४७च्या फाळणीदरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. हुसैन हे कापड उद्योगातील नामांकित व्यापारी असून राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी सिंध प्रांताचे राज्यपाल म्हणून अल्पकाळ काम पाहिले होते. त्या वेळी झालेल्या लष्करी उठावात त्यांना पदत्याग करावा लागला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2013 1:00 am

Web Title: india born mamnoon hussain elected as pakistans 12th president
Next Stories
1 ब्रिटनला जाणाऱ्या भारतीयांवर बॉण्डचा बोजा
2 पहिली प्रदूषणमुक्त हायड्रोजन बस तयार
3 भारतात गेल्या वर्षी प्राण्यांच्या १३० प्रजातींचा शोध
Just Now!
X