पाकिस्तानने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला हवाई हद्दीची परवानगी नाकारली आहे. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या या कृतीमुळे पाकला कडक धडा शिकवण्याचा निर्णय भारताने घेतला असून त्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. भारताने इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनकडे (आयसीएओ) याबाबत तक्रार केली आहे.

आयसीएओकडे इतर देश ओव्हर फ्लाईटची मंजुरी मागतात आणि याला या संघटनेकडून मंजुरीही दिली जाते. भारत या नियमांनुसार आयसीएओकडे वारंवार ओव्हर फ्लाईटसाठी मंजुरी घेत राहणार आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून अडमुठे धोरण अवलंबले जात असल्याचा मुद्दाही या संघटनेकडे उपस्थित केला जाणार आहे.

आयसीएओकडे गेल्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने आपल्या या वागण्याचा पुन्हा विचार करायला हवा. त्याचबरोबर पाकिस्तानने एकतर्फी कारवाई करण्याच्या आपल्या कृतीला चुकीच्या पद्धतीने मांडण्याची जुनी सवय बदलायला हवी.

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी भारताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला हवाई हद्द खुली करण्याची विनंती धुडकावून लावली होती. पंतप्रधानांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी भारताने ही परवानगी मागितली होती. पाकिस्तानने यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या युरोप दौऱ्यासाठी देखील आपली हवाई हद्द खोलण्यास नकार दिला होता.