पूर्व लडाखमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत जी स्थिती होती, तशीच ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. पण त्याचवेळी चीनने कुठलीही आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुद्धा तयार आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० रणगाडे तैनात केले आहेत. हे रणगाडे क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत.

आज चुशुल येथे भारत आणि चीनच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये तणाव कमी करण्यासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. गलवान खोऱ्यात नदी काठाजवळ चीनने ज्या आक्रमक पद्धतीने सैन्याची जमवाजमव करुन शस्त्र सज्जता ठेवली आहे. ती लक्षात घेऊनच भारतीय सैन्याने इतक्या उंचावरील भागात टी-९० भीष्म रणगाडे तैनात करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- चीन विरुद्ध युद्ध झाल्यास अमेरिकेने भारताला दिलेली ही पाच ‘अस्त्र’ ठरु शकतात गेम चेंजर

या भागात उंचावरील क्षेत्रात भारतीय सैन्य महत्त्वाचा ठिकाणी तैनात आहे. पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या १५९७ किलोमीटरच्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याने युद्ध वाहनांसह १५५ एमएम हॉवित्झर तोफाही तैनात केल्या आहेत. चीनच्या कुठल्याही आव्हानाला प्रयुत्तर देण्यासाठी चुशुल सेक्टरमध्ये दोन टँक रेजिमेंट तैनात केल्या आहेत. चीनला एक इंचही भूमी द्यायची नाही. उलट यापुढे चीनची कुठलीही दादागिरी खपवून घ्यायची नाही अशी भारताची भूमिका आहे.

आणखी वाचा- ‘परिणामांचा विचार केल्यास, पुढे जाणे शक्य नाही’ मोदी सरकारची चीनच्या विषयावर स्पष्ट भूमिका

‘परिणामांचा विचार केल्यास, पुढे जाणे शक्य नाही’
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चीन बरोबर चर्चा सुरु ठेवली पाहिजे असे केंद्र सरकारचे मत आहे. पण त्याचवेळी गरज पडेल तेव्हा, लष्करी प्रत्युत्तर देण्यासाठी सुद्धा तयार असलं पाहिजे, यावर सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर एकमत होत आहे. नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेमध्ये टक्कर, लढाई हे शब्द आले. उच्चस्तरीय सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला ही माहिती दिली.

आणखी वाचा- ६ राफेल लढाऊ विमानांची तुकडी २७ जुलैपर्यंत भारतात

“आम्हाला तणाव वाढवायचा नाही. पण चीनच्या दबावासमोर झुकून तडजोड सुद्धा करणार नाही. आम्ही माघार घेणार नाही. आम्ही त्यांचा सामना करु” असे या चर्चेमध्ये सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ‘चीन बरोबरच्या संघर्षात परिणामांचा विचार केल्यास तुम्हाला पुढे जाणे शक्य होणार नाही ही सरकारची भूमिका आहे’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.