इम्रान खान यांच्या पवित्र्यावर भारताची सडकून टीका

नवी दिल्ली / इस्लामाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा काहीही हात नाही, हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा भारताने धुडकावला आहे. या भीषण हत्याकांडाचा साधा निषेधही न करणारे खान यांचा ‘आमचा त्याच्याशी काही संबंध नाही,’ हे सांगण्याचा पवित्रा पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या पठडीला अनुसरून आणि अपेक्षितच आहे, अशी टीकाही परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. हल्ल्याचा सूत्रधार जैश ए महम्मदचा मसूद अझर याला पाकिस्ताननेच आश्रय दिल्याचा आरोपही होत आहे. या पाश्र्वभूमीवर, भारतीय लष्कर या निर्घृण कृत्याचा वचपा काढण्यास पूर्ण स्वतंत्र आहे, असा सूचक इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिला आहे.

इम्रान खान यांनी मंगळवारी भारताचा आरोप फेटाळला तसेच भारताने यात पाकिस्तानातील कुणाचा हात असल्याचे ठोस पुरावे दिले तर आम्ही कारवाई करू, असेही स्पष्ट केले. त्याचवेळी, भारताने आमच्यावर जर आक्रमण केले, तर त्याचे निकराने प्रत्युत्तर दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. पुलवामा येथे झालेला हल्ला म्हणजे दहशतवादी कृत्य नव्हे, असा निर्लज्ज पवित्राही खान यांनी घेतला आहे. त्याचाही भारताने समाचार घेतला आहे. जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेने  हा हल्ला घडवून आणल्याची कबुली दिली आहे. ही संघटना पाकिस्तानात आहे. असे असताना यात आमचा काही हात नाही की संबंध नाही, हे पाकिस्तानचे वक्तव्य म्हणजे ढोंगीपणा आहे.

हल्ला करणारा अतिरेकी महम्मद दार याला २०१७पासून अनेकदा काश्मिरात अटक झाली होती. मग त्याची सुटका का झाली, भारतीय सैनिकांच्या ताफ्याच्या वाहतुकीत आवश्यक ते नियम का पाळले गेले नाहीत, गुप्तचर पातळीवर कुचराई झाली का, असे प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित झाले आहेत. त्यांची उत्तरे आधी भारताने शोधावीत, असा आगाऊ सल्लाही पाकिस्तानने आधीच दिला आहे. त्यानंतर उभय देशांतील संबंध विकोपाला गेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल विविध देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करीत आहेत.

आता युद्ध कराच..

पाकिस्तानच्या घातपातात रोज सैनिकांचे जीवित धोक्यात घालण्यापेक्षा भारताने एकदाचे पाकिस्तानशी युद्ध करून या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा, असे मत बाबा रामदेव यांनी मंगळवारी रायपूर येथे व्यक्त केले.

‘आम्ही पकडून देतो!’

मसूद अझर हा भवालपूर येथे दडून बसला आहे आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या सहाय्याने अनेक हल्ल्यांचे नियोजन करत आहे. इम्रान खान यांना तो सापडत नसेल, तर त्यांनी आम्हाला कळवावे, आम्ही त्याला पकडून देतो, असे ट्विट पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे. आता तुम्ही पुरावे मागता, मग २६/११ मुंबई हल्ल्याचे पुरावे देऊन त्याचे काय केलेत, असा सणसणीत सवालही अमरिंदर सिंग यांनी केला आहे.

पाकिस्तान तोंडघशी

या हल्ल्याशी आमचा संबंध नाही, असे पाकिस्तानने जाहीर केल्यापाठोपाठ ‘हा हल्ला आम्हीच घडविला,’ असा पुनरुच्चार करणारी नवी चित्रफीत जैश-ए-महम्मदने मंगळवारी जारी केली. असाच हल्ला आम्ही पुन्हा कुठेही घडवू शकतो, असे एका बुरखाधारी अतिरेक्याने या चित्रफितीत सांगितले.

फ्रान्सचा प्रस्ताव

जैश ए महम्मदचा मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करावे, असा प्रस्ताव फ्रान्स येत्या काही दिवसांत संयुक्त राष्ट्रांत मांडणार आहे. २०१६पासून दोनदा फ्रान्सने हा प्रस्ताव मांडला असला तरी चीनच्या विरोधामुळे तो बारगळला आहे.