रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अंबानी १८ अब्ज डॉलरचे धनी असून त्यांच्यासह भारतात तब्बल ७० व्यक्ती अब्जाधिश असल्याचं एका अहवालात स्पष्ट झालं आहे. दरम्यान, श्रीमंतांच्या जागतिक यादीत ६८ अब्ज डॉलरचे मालक असलेले बिल गेट्स हे पुन्हा एकदा पहिल्या स्थानी राहिले आहेत. चीनमधील हुरून या कंपनीने ही श्रींमंत व्यक्तींची यादी बनवली असून सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या देशांच्या यादीत भारताने पाचवे स्थान मिळवले आहे. मुकेश अंबानी यांच्यानंतर लक्ष्मी मित्तल – १७ अब्ज डॉलर्ससह दुस-या, सन फार्माचे दिलीप सांघवी आणि विप्रो अजीम प्रेमजी – प्रत्येकी १३.५ अब्ज डॉलर्ससह तिस-या स्थानावर आहेत. तर जागतिक स्तरावर मित्तल ४९ व्या स्थानावर आहेत. सांघवी आणि प्रेमजी हे ७७ व्या स्थानावर आहेत.
भारतातील आकडेवारीवर नजर टाकल्यास अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने भारतातील अब्जाधिशांना जागतिक यादीत अग्रक्रम मिळवता आला नाही असे या अहवालात म्हटले आहे. मात्र तरीदेखील सर्वाधिक अब्जाधिश असलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशातील अब्जाधिशांच्या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ ने वाढ झाली असून आता ७० भारतीयांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
हुरुनच्या अहवालानुसार भारतात जर्मनी, स्वित्झरलँड, फ्रान्स आणि जपानपेक्षा जास्त अब्जाधिश आहेत. सर्वाधिक अब्जाधिक अमेरिका (४८१), चीन (३५८) मध्ये आहेत. न्यूयॉर्क अब्जाधिशांची राजधानी ठरली आहे. अब्जाधिशांचे सरासरी वय ६४ वर्ष आहे.