करोनामुळे जगभरामध्ये दहशत पसरली आहे. अनेक देशांनी मागील काही वर्षांमध्ये पाहिले नव्हते इतके मृत्यू या साथीच्या रोगामुळे झाले आहेत. अनेक देशांमधील सरकारी यंत्रणांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु केलं आहे. मात्र करोनाग्रस्तांची जगभरातील संख्या एक लाख ८२ हजारहून अधिक झाली आहे. हा रोग आणखीन पसरु नये म्हणून वेगवेगळ्या देशांमधील अनेक शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. भारतामध्येही करोनाचे शंभरहून अधिक रुग्ण अढळून आले आहेत. मात्र भारत सरकारने करोनाला थांबवण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहेत. यावरुनच आता जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेन्क बेकेनडॅम यांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केलं आहे.

“या आजारासंदर्भात भारत सरकारने आणि पंतप्रधान कार्यालयाने घेतलेले निर्णय आणि सुरु असणारे काम हे प्रचंड मोठ आहे. या कामाने मी प्रभावित झालो आहे. याच निर्णयांमुळे करोनाला थांबवण्यात भारत अद्याप तरी यशस्वी ठरला आहे. प्रत्येक यंत्रणा काम करत आहे हे पाहून नक्कीच प्रभावित झालो आहे,” असं मत बेकेनडॅम यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केलं आहे. बेकेनडॅम यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) कौतुक केलं आहे. “भारताकडे संशोधनाची चांगली क्षमता आहे. खास करुन आयसीएमआर आणि आरोग्य विभागाकडे आरोग्यसंदर्भात संशोधनाची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी या विषाणूवर संशोधन सुरु केलं आहे. आता भारत हा संशोधक देशांमध्ये गणला जाईल,” असा विश्वास बेकेनडॅम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.

करोनाचा ज्या विषणामुळे संसर्ग होतो त्या विषणूचा प्रकार कोणता आहे हे भारतीय संशोधकांनी शोधून काढलं आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं (सीआरएमआर- एनआयव्ही) हा विषाणू वेगळा करून त्याच्या रचनेचा रहस्यभेद केला आहे. भारतात अढळून आलेल्या करोनाच्या केरळमधील पहिल्या तीन रुग्णांच्या नमुन्यांमधून या विषाणूबद्दलची माहिती संशोधकांनी शोधली होती.

युरोपमधील अनेक देश ज्यामध्ये इटली, युनायटेड किंग्डम आणि स्पेनसारख्या देशांमध्ये करोनाने थैमान घातलं असताना भारताने मात्र अधिक सक्षमपणे या आजाराविरोधात लढा सुरु ठेवल्याचे चित्र दिसत आहे.