पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे सत्र सुरूच आहे. आता भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना शीख भाविकांना भेटण्यापासून रोखले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी याप्रकरणी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वीही भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमधील एका क्लबमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतातून येणाऱ्या शीख भाविकांबरोबर तीर्थस्थळी जाणे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची सूट असते, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. काऊन्सलर आणि राजशिष्टाचाराशी निगडीत जबाबदारी पाहता भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांना ही सूट दिली जाते. वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी किंवा कठीण परिस्थिती उद्भवल्यास एकमेकांना मदत करण्याचा यामागचा उद्देश असतो.

भारतातून सुमारे १८०० शीख भाविक गुरूवारी पाकिस्तानला गेले होते. बैसाखी उत्सव साजरा करण्यासाठी हे रावळपिंडीच्या गुरूद्वारा पंजा साहिबला गेले होते. त्यावेळी भारतीय अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये शीख भाविकांना भेटण्यापासून रोखले होते आणि त्यांना राजशिष्टाचाराची अंमलबजावणीही करू दिली नव्हती. यावरून भारत सरकारने आपला आक्षेप नोंदवला होता.

परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारतीय पथक शीख भाविकांना भेटण्यासाठी वाघा रेल्वे स्थानकावर दि. १२ एप्रिल रोजी गेले होते. पण तिथे त्यांना भेटू दिले नाही. दि. १४ एप्रिल रोजी भाविकांबरोबर राजनैतिक अधिकारी आणि दूतावास यांच्यात बैठक ठरली होती. पण ऐनवेळी पाकिस्तानने ही बैठकही होऊ दिली नाही. भारतीय राजनैतिक अधिकारी अजय बिसेरिया जेव्हा गुरूद्वाराकडे जात होते, तेव्हा मध्येच त्यांना थांबवून सुरक्षेचा हवाला देत परत पाठवले होते.

भारताकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली. ही वर्तणूक राजदूतांबरोबर दुर्व्यवहारच्या श्रेणीत येते. पाकिस्तानची ही कृती म्हणजे व्हिएन्ना परिषद १९६१ चे उल्लंघन आहे. धार्मिक तीर्थ यात्रेकरूंसाठी द्विपक्षीय प्रोटोकाल १९७४ आणि नुकताच द्विपक्षीय संबंधांवरून दोन्ही देशांच्या सहमती तयार करण्यात आलेल्या कराराचे हे उल्लंघन आहे.