मागील आठ वर्षात देशात ७५० वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. यापैकी अनेक वाघांचा मृत्यू हा शिकारीमुळे झाला आहे. तर काही वाघांचा मृत्यू हा इतर कारणांमुळे झाला आहे. मध्यप्रदेशात वाघांच्या मृत्यू सर्वाधिक आहेत. मध्यप्रदेशात गेल्या आठ वर्षात १७३ वाघांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार समोर आली आहे.

मागील आठ वर्षात ज्या ७५० वाघांचा मृत्यू झाला त्यापैकी ३६९ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. तर १६८ वाघांचा मृत्यू हा बेकायदा शिकारीत झाला आहे. ७० वाघांच्या मृत्यूंची चौकशी सुरु आहे. तर ४२ वाघांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. ज्यामध्ये अपघात किंवा इतर घटनांचा समावेश आहे.

मध्यप्रदेशानंतर महाराष्ट्रात वाघांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या आठ वर्षांमध्ये १२५ वाघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात १११ वाघांचा मृत्यू गेल्या आठ वर्षांमध्ये झाला आहे. उत्तराखंडमध्ये ही संख्या ८८ आहे. तामिळनाडू आणि आसाममध्ये ही संख्या प्रत्येकी ५४ आहे. केरळ आणि उत्तर प्रदेशात ३५, राजस्थानात १७, बिहारमध्ये ११ तर पश्चिम बंगालमध्ये १० वाघांच्या मृत्यूची नोंद करणअयात आली आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. ओदिशा आणि आंध्र प्रदेशात सात, तेलंगणमध्ये पाच, दिल्ली आणि नागालँडमध्ये प्रत्येकी दोन तर गुजरात आणि हरयाणा या राज्यांमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे.