नेपाळ आपल्याकडील विजेचा पुरवठा करून भारताला ‘अक्षय्य प्रकाश’ देऊ शकते. मात्र आम्हाला ही वीज फुकट नको, आम्ही ती विकतच घेऊ, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलविद्युत प्रकल्पांनी समृद्ध असलेल्या नेपाळकडे सहकार्याचा हात मागितला. उभय देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा ५६०० मेगावॉटच्या पंचेश्वर बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प सहकार्य करारावर मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी स्वाक्षऱ्याही केल्या. तसेच उभय देशांमधील ऊर्जेच्या खरेदी-विक्रीविषयक करारावरही येत्या ४५ दिवसांत शिक्कामोर्तब करण्याचे ठरविण्यात आले.
भारत-नेपाळ सीमेवर महाकाली नदीबाबतच्या १९९६च्या करारात या प्रकल्पाच्या उभारणीचा उल्लेख होता. मात्र, दोन्ही देशांत प्रकल्पाच्या ग्राह्यकक्षा न ठरल्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.  –