भारतातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे. जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून या यादीत भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारताने जपानला मागे टाकले असून या यादीत अमेरिकेने पहिले स्थान पटकावले आहे.

‘प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने एक अहवाल तयार केला असून जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जगातील परदेशी गुंतवणुकासाठी फेव्हरेट डेस्टिनेशन कोणते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी अनेक सीईओंनी पसंती दर्शवली आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे. या यादीत भारताने जपानला मागे टाकले आहे.

भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही मोदींकडून ‘मेक इन इंडिया’चा प्रसार केला जाणार आहे. मोदी या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर या काहीसे अयशस्वी मानले जाणाऱ्या पावलांचे समर्थन ते यावेळी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा अहवाल समोर आला आहे.

नाणेनिधीकडूनही दिलासा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) खूशखबर दिली असून या वर्षी म्हणजे सन २०१८-१९ मध्ये भारताचा विकासदर ७.४ टक्के राहील, असे भाकीत या वित्तीय संस्थेने केले आहे. त्या तुलनेत चीनच्या अर्थव्यवस्थेची गती ६.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी या दोन प्रमुख कारणांमुळे विकासदर तुलनेत कमी होऊन ६.७ टक्क्यांवर आला होता. २०१९-२० मध्ये विकासाचा वेग ७.८ टक्क्यांच्या आसपास राहील.