कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतानं इराणी नागरिकांना दिलेले ई-व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमधील सर्वोच्च नेते अयातोला अली खामेनेई यांचे सल्लागार मोहम्मद मीरमोहम्मदी यांचा काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. चीननंतर इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसंच इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे. इराणमध्ये आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन ६६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १ हजार ५०१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.

इराणी नागरिक आणि १ फेब्रुवारीनंतर इराणचा दौरा करणाऱ्या नागरिकांना जारी करण्यात आलेले व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत भारतात प्रवेश केला नाही, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे. हे नागरिक कोणत्याही मार्गानं भारतात प्रवेश करू शकत नाहीत, असं ब्यूरो ऑफ इमिग्रेशननं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

इराणमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्था, भाविक आणि मच्छिमारांचाही समावेश आहे. यांच्यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचं अद्याप समोर आलं नाही. दरम्यान, अडकलेल्या या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी संबंधित राज्य सरकारांनीही केंद्राकडे मदत मागितली आहे. “आतापर्यंतर कोणत्याही भारतीयाला कोरोनाची लागण झालेली माही. आरोग्य विषयक सुचनांचं पालन करण्यासोबतच कोणत्याही प्रकारच्या अफवांना त्यांनी बळी पडू नये,” असं इराणमधील भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे इराणमध्ये अडकलेल्या मच्छीमारांचाही एक व्हिडीओ समोर आला होता. हा मुद्दा काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी संसंदेतही मांडला होता.

आणखी वाचा- भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचवर; दिल्ली, हैदराबादमध्ये सापडले नवे रुग्ण

भारतात पाच रूग्ण
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. व्हायरसची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. दिल्ली आणि हैदराबाद येथे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ज्या देशांमध्ये COVID-19 (कोरोना व्हायरस) या व्हायरसचा परिणाम झाला आहे, तिथून हे रुग्ण प्रवास करुन भारतात पोहोचले आहेत. तर भारतात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.