जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील निरीक्षण

जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदवण्यात आले आहे. मलेरियाचे अस्तित्व असलेल्या देशांपैकी त्याचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जगातील ११ देशांमध्ये मलेरियाच्या दृष्टीने जोखमीच्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित के ले होते. त्या देशांतील रुग्णसंख्येच्या गणितीय प्रारूपाच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. २००० ते २०१९ या कालावधीत भारतातील मलेरिया रुग्णांची संख्या तब्बल ७२ टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही ७४ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद के ले आहे.

२००० मध्ये भारतात २० लाख ३१ हजार ७९० रुग्णांना मलेरियाचे निदान झाले, त्यापैकी ९३२ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये तीन लाख ३८ हजार ४९४ रुग्णांना मलेरिया झाला, त्यापैकी ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे २००० आणि २०१९ मध्ये संसर्गाचे प्रमाण ८४ टक्क्यांपर्यंत घटले, तर मृत्यूचे प्रमाण ९२ टक्के  एवढे कमी झाल्याचे दिसून आले आहे.

२०१८ च्या तुलनेत देशातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत २०१९ मध्ये १७.६ टक्के घट झाली आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये हे प्रमाण २७.६ टक्के घटल्याचे दिसून आले होते. २०१२ पासून सातत्याने मलेरिया रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यात भारताला यश आले आहे.

आकडेवारी अशी.. : ओडिसा, मेघालय, झारखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या सर्वाधिक मलेरिया रुग्ण आढळणाऱ्या राज्यांतही २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मलेरिया रुग्णसंख्या घटली आहे. चालू वर्षांतील रुग्णसंख्या आणि मृत्यू यांची मागील वर्षांशी तुलना करून ही घट दाखवण्यात आली आहे. २०१८ मध्ये चार लाख २९ हजार ९२८ रुग्णांना मलेरियाचे निदान झाले, त्यापैकी ९६ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये रुग्णांच्या प्रमाणात २१.७ टक्के  (३,३८,४९४), तर मृतांच्या प्रमाणात २० टक्के (७७) घट दिसून आली. २०१९ आणि २०२० या वर्षांतील ऑक्टोबपर्यंतच्या रुग्णसंख्येची तुलना के ली असता ४५.०२ टक्के एवढी घट झाल्याचे दिसून आले आहे.

रुग्णसंख्या घटते आहे, ही बाब समाधानकारक आहे, मात्र त्यामुळे गाफील राहिल्यास ते योग्य ठरणार नाही, कारण मलेरिया रुग्णसंख्येत अशी घट दर १०-१५ वर्षांच्या कालावधीनंतर दिसून येते, हे एक प्रकारचे नैसर्गिक चक्र आहे. मात्र, मोठय़ा संख्येने मलेरियाची जोखीम असलेल्या राज्यांमध्ये चाचण्यांच्या अद्ययावत सुविधा, औषधे, सर्वेक्षण यांच्या माध्यमातून मलेरिया रुग्णसंख्या रोखण्यात यश आले आहे. ही परिस्थिती पुढील ५ ते १० वर्षे कायम राहिली तर आपण मलेरियाच्या उच्चाटनाच्या मार्गावर आहोत, असे म्हणता येईल.    

– डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य, केंद्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंधक तांत्रिक सल्लागार समिती