पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अड्डा भारतीय हवाई दलाने उद्ध्वस्त करून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारताने पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावा अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय हवाई दलाच्या शूर जवानांचे अभिनंदन केले. आपल्या भारतीय सैन्यातील जवान अतुलनीय शूर असून आपल्या जवानांचा आम्हाला अभिमान असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एनडीए सरकारने पाकिस्तानवर केलेला दुसरा सर्जिकल स्ट्राइक अभिनंदनीय असून पाकला कायमचा धडा शिकविण्यासाठी संपूर्ण देश  एकजुटीने सरकार आणि सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत चोख उत्तर दिलं आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली हल्ला करण्यात आला. नरेंद्र मोदी स्वत: अॅक्शन रुममध्ये हजर होते.

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. ठार करण्यात आलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे.