News Flash

India vs Bangladesh T20 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताने मिळवला विजय

दिनेश कार्तिकने उभारली भारताच्या विजयाची गुढी

तोंडाशी आलेला घास संथ फलंदाजीमुळे गमवण्याची वेळ भारतीय संघावर रविवारी ओढवली होती, परंतु दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून बांगलादेशचे निदाहास ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. कार्तिकच्या षटकारामुळे भारताने चार विकेट राखून रोमहर्षक विजयाची नोंद केली. कार्तिकने ८ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकार लगावत नाबाद २९ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
बांगलादेश धावांचा यशस्वी पाठलाग करू शकतो, याची जाण ठेवत भारताने त्यांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्माचा हा डाव यशस्वी ठरला. तमिम इक्बाल आणि लिटन दास हे दोन्ही सलामीवीर फलकावर २७ धावा असताना माघारी परतले होते. मात्र, शब्बीर रेहमानने एका बाजूने झुंज कायम राखताना बांगलादेशची धावगती वाढवली. त्याला महमदुल्ला आणि मेहदी हसन यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी करून चांगली साथ दिली. रेहमानने ५० चेंडूंत ७ चौकार व ४ षटकार खेचत ७७ धावांची उपयुक्त खेळी केली. रेहमानच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने निर्धारित २० षटकांत १६६ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि सुरेश रैना यांना त्वरित माघारी पाठवण्यात बांगलादेशला यश आले. भारत २ बाद ३२ अशा अवस्थेत असताना कर्णधार रोहित शर्मा एका बाजूने खिंड लढवत होता आणि त्याला लोकेश राहुलची उत्तम साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, रोहित आणि राहुल माघारी परतल्यानंतर भारतारवर दडपण निर्माण करण्यात बांगलादेश यशस्वी झाले. रोहितने ४२ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. विजय शंकर आणि मनिष पांडे यांना धावांची गती वाढवता आली नाही. त्या दडपणाखाली पांडे बाद झाला. कार्तिकने सामना ६ चेंडूंत १२ धावा असा आणला. विजय शंकरने अखेरच्या षटकात एक चेंडू निर्धाव खेळल्याने भारत पराभवाच्या छायेत गेला. मात्र, अखेरच्या चेंडूवर पाच धावा हव्या असताना कार्तिकने षटकार खेचून भारताला जेतेपद पटकावून दिले.

संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ८ बाद १६६ (शब्बीर रेहमान ७७, महमदुल्ला २१, मेहदी हसन नाबाद १९; युझवेंद्र चहल ३/१८, जयदेव उनाडकट २/३३, वॉशिंग्टन सुंदर १/२०) वि. वि. भारत : ६ बाद १६८ (रोहित शर्मा ५६, मनीष पांडे २८, दिनेश कार्तिक नाबाद २९; रुबेल हुसेन २/३५)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2018 10:49 pm

Web Title: india vs bangladesh t20 final india beat bangladesh by six wickets in the last ball
Next Stories
1 पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाने पटकावला इराणी करंडक
2 मोहम्मद शमीचा आयपीएल सहभाग निश्चित; बीसीसीआयने दिली क्लिन चीट
3 दिवसरात्र कसोटी सामना हैदराबाद किंवा राजकोटला
Just Now!
X