भारत आणि चीन या दोन्ही शेजारी देशांमध्ये मे महिन्यापासून पूर्व लडाखच्या भागात तणावाची स्थिती आहे. भारतीय सैन्य गेल्या पाच महिन्यांपासून या भागात १४,५०० फूटांहून अधिक उंचीवर चीनच्या सैन्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र, हिवाळ्यात इथली नैसर्गिक परिस्थिती अत्यंत बिकट असते. या पार्श्वभूमीवर उणे ४० डिग्री सेल्सिअस तापमानातही चीनला उत्तर देण्यासाठी भारताने नवी रणनिती आखली आहे. याअंतर्गत रविवारी भारताने पूर्व लडाखमध्ये सीमेजवळ टी-९० आणि टी-७२ रणगाडे आणि बीएमपी-२ इन्फट्री कॉम्बेट व्हेईकल तैनात केले आहेत.

लेहपासून २०० किमी अंतरावर पूर्व लडाखमध्ये चुमार-डेमचोक भागात एलएसीजवळ टी-९० आणि टी-७२ रणगाडे आणि बीएमपी-२ पायदळाची वाहनं तैनात करण्यात आली आहेत. या भागात चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताचं सैन्य सज्ज झालं आहे. हे रणगाडे उणे ४० डिग्री सेल्सिअस तापमानाला देखील चालवता येतात. हिवाळ्यात पूर्व लडाखच्या भागात भीषण थंडी असते. या ठिकाणी रात्रीच्या तापमानात सामान्य तापमानापेक्षा ३५ डिग्रीने घट होते तसेच उच्च वेगाने थंड वारे वाहतात.

भारतीय सैन्याच्या या सज्जतेबाबत माहिती देताना १४ कॉर्प्सचे प्रमुख मेजर जनरल अरविंद कपूर म्हणाले, “या भूभागावरती रणगाडे, पायदळाची लढाऊ वाहनं आणि मोठ्या तोफांची देखभाल करणे मोठे आव्हान असते. जिथे सिंधू नदी पूर्व लडाखच्या भागातून वाहते तिथे नद्या पार करणे आणि इतर अडथळ्यांना पार करुन त्या क्षेत्रात पूर्ण सज्जता ठेवण्याइतकी भारतीय रणगाडा रेजिमेंटची क्षमता आहे.”

“फायर अँड फ्युरी कॉर्प्स ही भारतीय सैन्याची एकमेव रचना आहे. जगभरात अशा कठीण भागात अशा यांत्रिक दलांना तैनात करण्यात आलं आहे. या भागात रणगाडे, पायदळाच्या लढाऊ वाहने आणि तोफांची देखभाल करणे मोठं आव्हान असतं. चालक दल आणि उपकरणांच्या तत्परता निश्चित करण्यासाठी जवान आणि मशीन दोन्हींसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे,” असंही कपूर यांनी सांगितलं.

“भारतीय सैन्याच्या मशिनकृत पायदळाला कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही भागात काम करण्याचा अनुभव आहे. उच्च वेगाचा दारुगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या साठ्यांच्या सुविधांमुळे मोठ्या कालावधीपर्यंत लढाई करण्याची या दलाची क्षमता आहे. इथं तैनात असलेल्या रेजिमेंट्समध्ये काही मिनिटांतच एलएसीपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे,” अशी माहिती मेजर जनरल कपूर यांनी दिली.