भारत व चीनमध्ये सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ)भारतीय लष्कराला एक विशेष अत्याधुनिक ड्रोन तयार करून देण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्ये ‘एलएसी’ च्या भागावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी या ड्रोनची मदत होणार आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे असलेल्या या अत्याधुनिक ड्रोनला ‘भारत’ असे नाव देण्यात आलेले आहे.

लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कन्ट्रोल (एलएसी)वर बारकाईने लक्ष देण्याबरोबरच हे ड्रोन उंचीवरील भाग आणि पर्वतीय भागांमध्ये देखील लक्ष ठेवण्यास भारतीय लष्कराला मदत करणार आहे.

भारतीय लष्कराला पूर्व लडाख क्षेत्रात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष ड्रोनची आवश्यकता होती. यासाठी डीआरडीओकडून ‘भारत’ ड्रोन देण्यात आले आहे. असे संरक्षण क्षेत्रातील सुत्रांकडून एएनआयला सांगण्यात आले आहे.

भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘भारत’ ड्रोनची निर्मिती डीआरडीओच्या चंदीगड येथील प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. हे ड्रोन ‘भारत’ मालिकेतील जगातील सर्वात वेगवान व वजनानी हलके असे पाळत ठेवणारे ड्रोन असून, पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा- युद्धात गेम चेंजर ठरणाऱ्या राफेल फायटर विमानांचे २९ जुलैला भारतात लँडिंग?

अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने निर्मिती –
हे भारत ड्रोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने परिपूर्ण असे आहे. जेणेकरून मित्र व शत्रू यांच्यातील फरक ओळखून त्यानुसार काम करेल. तसेच, लहान परंतू आतापर्यंतचे शक्तीशाली असे हे ड्रोन कोणत्याही ठिकाणाहून अचूकरित्या काम करू शकते. याची युनिबॉडी डिझाइन आणि अॅडव्हान्स रिलीज टेक्नॉलॉजी याला पाळत ठेवण्याच्या कामात अधिक उपयुक्त बनवते. याला अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की रडार देखील याला डिटेक्ट करू शकत नाही.

आणखी वाचा- P-8I मुळे हिंदी महासागरात भारताचा दबदबा वाढणार, शत्रुच्या पाणबुडीला बुडवण्याची क्षमता

‘भारत’ ड्रोनची वैशिष्ट्ये –
– भारत-चीन सीमेवरील वातावरण पाहता ड्रोन अत्यंत कमी तापमानात देखील काम करण्यास सक्षम आहे. शिवाय, वातावरणातील बदलानुसार त्यामध्ये बदल करता येऊ शकतात.
– भारत ड्रोन मोहीमेवर असताना रियल टाइम व्हिडिओ दाखवण्यास देखील सक्षम आहे. एवढेच नाहीतर रात्रीच्या अंधारातही अत्यंत स्पष्टपणे छायाचित्र किंवा हालचाली दाखवण्याची यामध्ये क्षमता आहे.
– डीआरडीओच्या सुत्रांच्यामते या ड्रोनची अशा विशिष्ट पद्धतीने निर्मिती करण्यात आली आहे की, जेणेकरून ते जंगल भागात लपलेल्या माणसांचा देखील अचूकपणे शोध घेऊ शकेल.